रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा निषेध
पालघर येथील ‘रिलीफ’मधील घटना; गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : गोविंदांच्या उपचाराच्या देयकावरून झालेल्या वादानंतर पालघर येथील रिलीफ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करून मालमत्तेचे नुकसान केल्याच्या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य शाखेसह बोईसर शाखेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पालघर पोलिसांनी तातडीने कारवाई करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या काही गोविंदांच्या उपचाराच्या देयकावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर काही व्यक्तींनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वाद घालत त्यांच्यावर हल्ला केल्याचे तसेच रुग्णालयाच्या परिसरातील मालमत्तेची तोडफोड केल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली. याप्रकरणी महाराष्ट्रातील आरोग्यसेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्थांवरील हिंसाचारास प्रतिबंध तसेच मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी असलेल्या २०१०च्या कायद्यासह अन्य संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय संघटनेने दिली आहे. या पार्श्वभूमीवर बोईसर शाखेने पालघर जिल्ह्यातील विविध वैद्यकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आणि प्रतिनिधींची बैठक घेतली. हल्ल्यात बाधित झालेल्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
वैद्यकीय संघटनेची भूमिका
आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, त्यांना धमकावणे किंवा रुग्णालयाच्या मालमत्तेची तोडफोड करणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही, अशी भूमिका वैद्यकीय संघटनेने स्पष्ट केली आहे. उपचार, देयक किंवा रुग्णालयाच्या सेवांबाबत काही तक्रार असल्यास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी कायदा हातात न घेता संबंधित यंत्रणेकडे तक्रार करून शांततापूर्ण व कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.