‘एमएमआरडीए’ला न्यायालयाचा दणका
मिठी नदीप्रकरणी दावा फेटाळण्यास न्यायालयाचा नकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मिठी नदी रुंदीकरण आणि खोलीकरणाशी संबंधितप्रकरणी जवळपास २० वर्षांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाविरुद्ध (एमएमआरडीए) दाखल केलेला ११५.६५ कोटी रुपयांचा दावा फेटाळण्यास उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला. ‘संयुक्त उपक्रमाच्या’ नावाने दावा दाखल करणे ही प्रक्रियात्मक त्रुटी असली, तरी ती सुधारण्याजोगी असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
दावा फेटाळण्याची एमएमआरडीएने दाखल केलेली याचिका न्या. संदीप मारणे यांच्या एकलपीठाने फेटाळून लावली. दिवाणी प्रक्रिया संहितेच्या (सीपीसी) तरतुदींनुसार ती त्रुटी सुधारता येऊ शकत असल्यास, वादीच्या नावात झालेली चूक हे आपोआप दावा फेटाळण्याचे कारण ठरू शकत नसल्याचेही न्यायालयाने एमएमआरडीएची याचिका फेटाळताना स्पष्ट केले. सीपीसीचे नियम न्यायालयांना दाव्यातील पक्षकारांशी संबंधित त्रुटी सुधारण्याचे अधिकार देते, असे कंत्राटदाराचा युक्तिवाद मान्य करताना न्यायालयाने स्पष्ट केले. प्रत्येक दाव्यात चुकीच्या वादीच्या नावाने दावा दाखल केल्याचे आढळल्यास मूळ अर्ज फेटाळला गेला, तर या संहितेच्या ‘आदेश १ नियम १०’ अन्वये न्यायालयाला दिलेले अधिकार निरर्थक ठरतील, असे निरीक्षणही एकलपीठाने नोंदवले. त्यामुळे, संयुक्त उपक्रमाच्या नावाने दावा दाखल करण्यातील त्रुटी सुधारता येऊ शकते आणि ती संपूर्ण दावा फेटाळून लावण्याचे कारण ठरू शकत नाही, याचा एकलपीठाने पुनरुच्चार केला.
प्रकरण काय?
संबंधित वाद ‘एमएमआरडीए’ने मार्च २००७ मध्ये बॅकबोन प्रोजेक्ट्स लिमिटेड (बीपीएल) आणि बॅकबोन कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (बीबीसी) यांना संयुक्त उपक्रमाने दिलेल्या कंत्राटाशी संबंधित आहे. हे कंत्राट माहीम कॉजवे आणि धारावी पूल यांच्यादरम्यान मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासाठी देण्यात आले होते. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान निर्माण झालेल्या वादामुळे, २०१७ मध्ये व्याजासह ११५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वसूल करण्यासाठी एक व्यावसायिक दावा दाखल केला होता. तथापि, सीपीसीच्या ''आदेश ७ नियम ११''अन्वये हा दावा फेटाळण्याची मागणी एमएमआरडीएने केली होती.
‘एमएमआरडीए’चा दावा
संयुक्त उपक्रम ही स्वतंत्र कायदेशीर संस्था नाही आणि त्यामुळे ती स्वतःच्या नावाने दावा दाखल करू शकत नाही, असा दावा एमएमआरडीएने याचिकेत केला होता. हा दावा केवळ त्या दोन घटक कंपन्यांनीच दाखल करायला हवा होता, असेही एमएमआरडीएने म्हटले होते. दुसरीकडे, मूळ कंत्राट त्याच नावाने करण्यात आले होते. त्यामुळे संयुक्त उपक्रमाच्या नावाने दावा दाखल करणे ही एक ‘प्रामाणिक चूक’ होती, असा दावा कंत्राटदाराच्या वतीने करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.