कागदपत्रांचा पसारा संपणार!
पालिका रुग्णालयांत २०२७ पासून डिजिटल रुग्णसेवेचे उद्दिष्ट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये १ एप्रिल २०२७ पर्यंत हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस) पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे उद्दिष्टपालिका आरोग्य विभागाने निश्चित केले आहे. रुग्णांची नोंदणी, डॉक्टरांचा सल्ला, तपासण्या, औषधांचे प्रिस्क्रिप्शन, रुग्णालयातील विविध विभागांचे कामकाज तसेच शुल्क भरणा यांसारख्या प्रक्रिया डिजिटल करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
पालिका आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एचएमआयएसचा विस्तार टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. सध्या काही रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागाची नोंदणी डिजिटल पद्धतीने सुरू झाली असून, त्यानंतर डॉक्टरांची तपासणी, रुग्णांचे उपचारविषयक रेकॉर्ड, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी आणि आंतररुग्ण विभागाशी संबंधित प्रक्रिया या प्रणालीशी जोडल्या जाणार आहेत.
एचएमआयएस एकाच दिवसात सर्व रुग्णालयांत सुरू करण्याऐवजी प्रत्येक रुग्णालयातील प्रक्रिया टप्प्याटप्प्याने डिजिटल केली जात आहे. प्रथम बाह्यरुग्ण विभाग, त्यानंतर डॉक्टरांचे सल्ले, आंतररुग्ण विभाग, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी आणि इतर विभाग प्रणालीशी जोडले जाणार आहेत. प्रत्येक टप्प्यावर प्रत्यक्ष वापर करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून प्रणालीची चाचणी घेतली जात आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढील टप्पा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे १ एप्रिल २०२७ ही अंतिम मुदत ठेवून त्यापूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
एकदाच नोंदणी, पुढील उपचारांचा डिजिटल इतिहास
एचएमआयएसमुळे रुग्णाने एकदा नोंदणी केल्यानंतर त्याची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे पुढील वेळी रुग्णालयात आल्यानंतर पुन्हा-पुन्हा कागदपत्रे आणि पूर्वीची माहिती सादर करण्याची गरज कमी होणार आहे. डॉक्टरांना रुग्णाचा पूर्वीचा उपचार इतिहास, तपासण्यांचे अहवाल आणि औषधोपचाराची माहिती डिजिटल पद्धतीने पाहता येणार आहे. त्यामुळे कागदपत्रांचा वापर कमी करण्याबरोबरच रुग्णांचा प्रतीक्षा वेळ कमी करण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.
ऑनलाइन पेमेंटलाही चालना
रुग्णालयांमध्ये रोख व्यवहार कमी करून ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन देण्याचीही तयारी आहे. एचएमआयएस आणि ऑनलाइन पेमेंट व्यवस्था परस्परांशी जोडल्याने रुग्णांना शुल्क भरण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
‘कागदविरहित रुग्णालया’कडे वाटचाल
पालिका आरोग्य विभागाचा भर केवळ एचएमआयएस सुरू करण्यावर नसून रुग्णालयातील संपूर्ण कामकाज अधिक पारदर्शक, वेगवान आणि रुग्णकेंद्रित करण्यावर आहे. त्यामुळे १ एप्रिल २०२७ पर्यंत सर्व पालिका रुग्णालयांमध्ये एचएमआयएस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास रुग्णसेवेत मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.