प्रवासी गंतव्य स्थानकाऐवजी थेट कारशेडमध्ये
वातानुकूलित लोकलमधील प्रकार; सानपाड्यानंतर ठाण्यातही गोंधळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : प्रवाशांना गंतव्य स्थानकाऐवजी थेट कारशेडमध्ये घेऊन जाणाऱ्या एसी लोकलच्या दोन घटना समोर आल्याने मध्य रेल्वेच्या प्रवासी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सानपाडा कारशेडमध्ये काही प्रवासी पोहोचल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (ता. ७) दादरहून धावणाऱ्या ठाणे एसी लोकलला काही प्रवाशांनी टिटवाळा लोकल समजून प्रवास केला. ठाणे स्थानकानंतर ही लोकल कळवा कारशेडकडे रवाना झाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. विशेष म्हणजे, दोन्ही घटनांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहेत.
सानपाडा येथील घटनेत सेवा पूर्ण झाल्यानंतर एसी लोकल कारशेडकडे रवाना करण्यात आली; मात्र काही प्रवासी डब्यातच राहिले. लोकल कारशेडमध्ये पोहोचल्यानंतर आपण चुकीच्या ठिकाणी आल्याचे त्यांच्या लक्षात आले. कारशेडकडे लोकल रवाना करण्यापूर्वी उद्घोषणा करण्यात आली होती, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले; मात्र उद्घोषणा करूनही प्रवासी डब्यातच कसे राहिले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर सोमवारी दादर स्थानकातून दररोज दुपारी ३.३३ वाजता टिटवाळा एसी लोकल म्हणून धावणारी गाडी त्या दिवशी ठाणे एसी लोकल म्हणून धावली. त्यामुळे नेहमीच्या वेळापत्रकानुसार प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी ती टिटवाळा एसी लोकल असल्याचे समजून प्रवास केला. ठाणे स्थानकात पोहोचल्यानंतर लोकल पुढील प्रवासी सेवेसाठी न जाता थेट कळवा कारशेडकडे रवाना झाली. प्रवाशांचा गैरसमज झाला असला तरी लोकल कारशेडकडे रवाना होणार असल्याची स्पष्ट उद्घोषणा ठाणे स्थानकात होणे अपेक्षित होते, अशी प्रवाशांची भूमिका आहे. शिवाय, कारशेडकडे लोकल नेण्यापूर्वी डब्यांमध्ये प्रवासी शिल्लक नाहीत, याची खातरजमा केली जाते का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
चौकशीचे आदेश
सानपाडा घटनेची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. लोकल कारशेडकडे नेण्यापूर्वी उद्घोषणा करण्यात आली होती, तरीही काही प्रवासी रेकमध्ये कसे राहिले, याचा तपास केला जाणार आहे. दरम्यान, दोन्ही घटनांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने उद्घोषणा व्यवस्था आणि कारशेडकडे लोकल रवाना करण्यापूर्वीची प्रवासी तपासणी यंत्रणा पुन्हा चर्चेत आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.