म्हाडाच्या घरांसाठी वन विभाग, गिरणी कामगारांमध्ये रस्सीखेच!
शिरढोण, खोणीच्या ६,५०० घरांसाठी दोघांकडून कोकण मंडळाकडे पाठपुरावा; ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : म्हाडाच्या कोकण मंडळाची शिरढोण आणि खोणी येथे जवळपास ६,५०० हजार विक्रीअभावी पडून असून, त्याच्या खरेदीसाठी वन विभाग आणि गिरणी कामगारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. ही घरे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) अतिक्रमणधारकांना मिळावीत, यासाठी वन विभागाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच गिरणी कामगारांच्या ९ संघटनांनी कोकण मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत घरे मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे शिरढोण, खोणीची घरे कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
म्हाडाचे शिरढोण आणि खोणी येथे स्वतंत्र गृहप्रकल्प आहेत. या घरांना मोठी मागणी नसल्याने म्हाडाने याआधीच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) सुमारे १,२०० घरे भाडेतत्त्वावर देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, वन विभागाने नॅशनल पार्कमधील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पात्र ठरणाऱ्या अतिक्रमणधारकांना घरे द्यावी लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वन विभाग आणि नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली असून, सोमवारी मंत्रालयातही यावर बैठक झाली आहे.
शिरढोण आणि खोणी येथे असलेली सुमारे ६,५०० घरे घेण्यासाठी वन विभागाने फिल्डिंग लावलेली असतानाच गिरणी कामगारांच्या प्रतिनिधींनी म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांची भेट घेत सदरची घरे गिरणी कामगारांना द्यावी अशी मागणी केली आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
३० सप्टेंबरपर्यंत निर्णय
वन विभाग आणि गिरणी कामगारांनी शिरढोण आणि खोणीच्या घरांसाठी प्रयत्न सुरू केले असले तरी ३० सप्टेंबरपर्यंत जे कोणी कन्फर्म करेल त्यांना सदरची घरे देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी सांगितले. दरम्यान, सदरची घरे विकण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.