महापारेषणच्या मुख्यालयात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे प्रदर्शन, विक्री
५० हून अधिक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशभक्तांसाठी महापारेषणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगंगा येथे पर्यावरणपूरक आणि आकर्षक गणेशमूर्तींची पर्वणी उपलब्ध झाली आहे. अहिल्यानगर येथील यशोदानंद गोशाळेच्या वतीने गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री करण्यात येत असून, वेगवेगळ्या प्रकारच्या ५० हून अधिक गणेशमूर्ती उपलब्ध आहेत.
महाराष्ट्रातील पारंपरिक मूर्तिकलेला प्रोत्साहन देतानाच मुंबईतील गणेशभक्तांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित हे प्रदर्शन १३ सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात अहिल्यानगर येथील प्रसिद्ध मूर्तिकार मिलिंद राऊत आणि निकिता राऊत यांनी साकारलेल्या ५० हून अधिक आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध आहेत.
पर्यावरणपूरक गणपतीची किंमत १,२०० रुपयांपासून १,५०० रुपयांपर्यंत आहे. गणेशमूर्तींसोबतच येथे पूजेसाठी लागणारे विविध साहित्य, आकर्षक सजावटीच्या वस्तू, पारंपरिक गोमय तोरणे, आसने आणि विविध पूजावस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत.