महाप्रसादाची अन्नसुरक्षा तपासणी कडक
मंडळांना कच्च्या मालाची नोंद, स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे पालन बंधनकारक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद, प्रसाद, अन्नदान आणि भंडाऱ्यांबाबत यंदा अन्नसुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, मंडळाचा आकार किंवा कार्यक्रमाची व्याप्ती यानुसार कोणतीही सवलत दिली जाणार नाही. मुंबईतील सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेश मंडळे या नियमांच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. अन्नवितरण करणाऱ्या मंडळांना कार्यक्रमाची माहिती प्रशासनाला आगाऊ देणे, वापरलेल्या कच्च्या मालाची व घटक पदार्थांची नोंद ठेवणे आणि खरेदीची बिले-पावत्या जतन करणे बंधनकारक आहे.
मंडळाने कंत्राटदारामार्फत खाद्यपदार्थ तयार करून घेतल्यास त्याच्याकडे आवश्यक अन्न परवाना असणे गरजेचे आहे. कच्चा माल अधिकृत खाद्य व्यावसायिकांकडूनच खरेदी करावा लागणार आहे. घरगुती पद्धतीने स्वयंपाक करणाऱ्या मंडळांनाही स्वच्छता, अन्न हाताळणी आणि घटकांचा मागोवा ठेवण्याच्या नियमांचे पालन करावे लागेल.
गणेशोत्सवात दूध व दुग्धजन्य पदार्थ, खवा, पनीर, मिठाई, खाद्यतेल, खाद्य रंग, सुकामेवा, बेसन, पाणी आणि बर्फ यांची तपासणी होऊ शकते.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, उत्सवाच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवणे हा उद्देश नसून मोठ्या प्रमाणावरील अन्नवितरण सुरक्षित राहावे, यासाठी विद्यमान अन्नसुरक्षा कायद्यांची समान अंमलबजावणी करणे हा हेतू आहे.
स्वच्छता कर्मचारी वाढवले
वडाळ्यातील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीने स्वच्छता कर्मचारी ७०-७५ वरून १०० पेक्षा अधिक करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना टोपी, हातमोजे व एप्रन देण्यात येणार आहेत.