ॲपआधारित टॅक्सीचालकांची ‘ओळख परेड’!
माहिती सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या चालकांची संपूर्ण माहिती परिवहन विभागाकडे सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकांची ओळख आणि वास्तव्याची खात्री अनिवार्य करण्यात आली आहे.
महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६च्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे तसेच भारत टॅक्सी, रॅपिडो, उबर, ओला, शालिनी कॅब आणि सिटीफ्लो या ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चालकांची ओळख, वास्तव्य तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व देण्यात येणार आहे. यासाठी चालकांचे डोमिसाइल प्रमाणपत्र तसेच आवश्यक ती सर्व माहिती तीन महिन्यांच्या कालावधीत सादर करावी, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या वेळी सांगितले.
ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये कार्यरत चालकांना कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. चालक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कामगार कायद्यानुसार उपलब्ध असलेल्या विविध सेवा-सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकांची ओळख आणि वास्तव्याची खात्री आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित चालकांचे डोमिसाइल प्रमाणपत्र, व्यावहारिक मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र चालकांना परिवहन विभागाकडून बॅज देण्यात येईल, असे सरनाईक यांनी सांगितले. अपघात तसेच गुन्हेगारीच्या घटना टाळण्यासाठी चालकांच्या अर्जांची आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या.
===
ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांना चालकांची आवश्यक माहिती संकलित करून परिवहन विभागाकडे सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत चालकांची संपूर्ण माहिती, डोमिसाइल प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.