प्रसूतीनंतर महिलेस चादरीतून रुग्णालयात दाखल
वैद्यकीय मदतीस विलंब झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : घरी प्रसूती झाल्यानंतर वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने एका महिलेला चादरीतून नजीकच्या महापालिका प्रसूतिगृहात नेण्याची वेळ कुटुंबीय आणि शेजाऱ्यांवर आली. ही घटना बुधवारी पहाटे कुर्ल्यात बुधवारी पहाटे घडली. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधूनही मदत न मिळाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, संबंधित कुटुंब अरुंद गल्लीत राहत असल्याने रुग्णवाहिकेला पोहोचता आले नसावे; मात्र रुग्णालयात आल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. बाळ आणि बाळंतिणीची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची पुढील महिन्यात प्रसूती होणार होती. त्यानिमित्त ती कुर्ला पश्चिमेकडील बैल बाजार परिसरात माहेरी आली होती; मात्र बुधवारी पहाटे अचानक तिची प्रसूती झाली. बाळाचा जन्म झाल्यानंतर महिलेस मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने प्रसूतिगृहाशी संपर्क साधून घराजवळ वैद्यकीय मदत पाठवण्याची विनंती केली; मात्र कोणताही डॉक्टर वा परिचारिका मदतीसाठी आला नाही. अखेर नाळ न कापलेल्या अवस्थेत कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने महिलेला चादरीत गुंडाळून रुग्णालयात दाखल केले. मदतीसाठी कुटुंबीयांनी नजीकच्या पोलिस ठाण्यातही धाव घेतली. कुटुंबीय आणि स्थानिकांनी चित्रित केलेल्या या घटनेचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये महिलेला अरुंद गल्ल्यांमधून चादरीत गुंडाळून डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहाकडे नेत असल्याचे दिसून येते.
रुग्णालयात पोहोचल्यानंतरही सुरुवातीला महिलेला उपचार मिळण्यात अडचणी आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपचार सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे.
---
दोघांचीही प्रकृती स्थिर
संबंधित महिलेची बुधवारी सकाळी घरीच प्रसूती झाली. त्यांचे कुटुंब अरुंद आणि दाटीवाटीच्या गल्ल्यांमध्ये राहते. त्यामुळे रुग्णवाहिकेला तेथे पोहोचणे कठीण झाले असावे; मात्र महिलेला रुग्णालयात आणल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुढील सर्व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्या. सध्या महिला आणि तिचे नवजात बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे मुंबई महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी सांगितले.