दहीहंडी कार्यक्रमात थट्टा
केली, मराठी चांगली येते
अभिनेता संजय दत्त याची दिलगिरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : अभिनेता संजय दत्त याने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना फोन करून ‘प्रताप भाई, जय महाराष्ट्र...’ अशी मराठीतून सुरुवात करून दहीहंडी कार्यक्रमातील वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. ‘आपण केवळ मस्करी करत होतो. मला चांगली मराठी येते. माझ्या बोलण्याने चुकीचा संदेश गेला असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो. माझे कुटुंबीय हे मुंबईकर आहेत. मी याच मातीत वाढलो असून, महाराष्ट्राने मला भरभरून दिले आहे, असे स्पष्टीकरण त्याने दिले.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानची महाराष्ट्रातील नामांकित दहीहंडी मानली जाते. ठाण्यात आयोजित या दहीहंडीला विविध अभिनेते, राजकीय नेते, व्यावसायिक हजेरी लावत असतात. या वर्षीदेखील संजय दत्त, सुनील शेट्टी, सूर्यकुमार यादव यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. सरनाईक यांच्या मराठी सक्तीच्या पार्श्वभूमीवर येणारा प्रत्येक सेलिब्रिटी मराठीत बोलत होता. जेव्हा संजय दत्त आला तेव्हा ताे म्हणाला की, ‘प्रतापभाई मी सहा वर्षे येरवड्यात राहूनसुद्धा मला मराठी शिकता आले नाही.’ त्याचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले होते. अनेकांनी त्यावर टीका केली.
===
शिवसेनाप्रमुखांचे उपकार
संजय दत्त याने याप्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढल्याचे समजते. आमच्या कठीण काळात साहेब माझ्या आणि कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे तो म्हणाला.