झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी नवी योजना
शौचालय स्वच्छतेचाही नव्या योजनेत समावेश; पालिकेचा वार्षिक १३६ कोटी खर्च
मुंबई, ता. १३ : मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ योजनेचे पुनरावलोकन करून तिचे नामकरण ‘बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना’ असे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नव्या योजनेवर पालिका दरवर्षी सुमारे १३६ कोटी रुपये खर्च करणार आहे. ‘आमचा समुदाय, आमचा अभिमान, आमचे आरोग्य’ हे या योजनेचे घोषवाक्य असेल. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
मुंबईतील सुमारे ४२ टक्के भाग झोपडपट्टीचा आहे. अरुंद रस्ते, गल्लीबोळ आणि दाट लोकवस्तीमुळे या भागातील दैनंदिन स्वच्छता आणि कचरा संकलनाचे काम आव्हानात्मक आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत हे काम विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केले जाते.
या संस्थांचे स्वयंसेवक झोपडपट्टीतील पायवाटा स्वच्छ करणे, घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, गल्लीबोळांतील लहान गटारे साफ करणे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे काम करतात. एकाच संस्थेकडून अनेक प्रकारची कामे करून घेतली जात असल्याने कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे महापालिकेने प्रस्तावात नमूद केले आहे. तसेच संस्थांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात गेल्या काही वर्षांत वाढ झालेली नाही. मनुष्यबळ आणि यंत्रणेची कमतरता तसेच अन्य काही त्रुटीही आढळून येत असल्याचे पालिकेने मान्य केले आहे.
नव्या योजनेत झोपडपट्टीतील नियमित स्वच्छतेसोबत सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचाही समावेश करण्यात येणार आहे. लोकसहभागातून सुमारे ८३५ नोंदणीकृत सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे.
स्वच्छता साहित्याकरिता स्वतंत्र निधी
सुधारित योजनेत १५० कुटुंबे किंवा ७५० लोकसंख्या असलेल्या क्षेत्रासाठी दरमहा १० हजार रुपये नेमून दिलेली कामे करण्यासाठी देण्यात येतील. त्याशिवाय स्वच्छता साहित्य, साधने आणि स्वयंसेवकांसाठी सुरक्षा साहित्य खरेदी करण्यासाठी एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित संस्थेला दरमहा एकूण ११ हजार रुपयांचे सहाय्य अनुदान मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.