‘स्पिक-मॅके’चे कार्य आज अधिक प्रासंगिक
राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचे प्रतिपादन
मुंबई, ता. ११ : राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंगस्ट युथ (स्पीक-मॅके) या संस्थेच्या पदाधिकारी व सल्लागार सदस्यांची बैठक (मीटिंग ऑफ माइंड्स) शुक्रवारी (ता. ११) महाराष्ट्र लोकभवन येथे झाली.
स्पीक मॅके ही विद्यार्थी व युवकांना भारताच्या संस्कृतीशी जोडण्याचे काम करणारी राष्ट्रीय संस्था असून संस्थेचे कार्य आज अधिक प्रासंगिक असल्याचे राज्यपालांनी या वेळी सांगितले. आपण एका संगीतप्रेमी घराण्यातून आलो असून स्पीक मॅके व इंटॅच संस्थेसोबत अनेक वर्षांपासून जुळलो असल्याचे राज्यपालांनी सांगितले. या दोन संस्थांसोबत काम करण्याचा आपला अनुभव समृद्ध करणारा असल्याचे राज्यपालांनी सांगितले. आजच्या युगात लोकांना मुक्तीसह सर्व गोष्टी तत्काळ हव्या असतात, अशावेळी स्पीक मॅकेचे कार्य महत्त्वाचे ठरते, असे त्यांनी सांगितले. शास्त्रीय संगीत व नृत्य विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवते. आज मुलांची व मोठ्यांची बुद्धी चंचल झाली असल्याचे सांगून (मंकी माईंड) आपण मुलांना जीवनातील संघर्षांना तोंड देण्यासाठी पुरेसे तयार करीत नसल्याचे निरीक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. किरण सेठ यांनी नोंदवले. स्पीक मॅके मुलांची व युवकांच्या सृजनात्मक शक्तीला शास्त्रीय कलांच्या माध्यमातून चालना देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला उद्योगपती शेखर बजाज, सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, संजय कुमार यादव, सुशील कुमार जीवराजका, माया शहानी, सूचित नंदा, योगेश आंधळे, ममता भट्टाचार्य आदी उपस्थित होते.
संस्थेचे मुख्य आश्रयदाते
१९७७ मध्ये स्थापन झालेल्या स्पीक मॅके संस्थेचे मुख्य आश्रयदाते होण्याचे मान्य केल्याबद्दल संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुंदा माहूरकर यांनी राज्यपालांचे आभार मानले. पुढील वर्षी २०२७ मध्ये स्पीक मॅके स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असून आयआयटी दिल्ली येथे व त्यानंतर आयआयटी मुंबई येथे सुवर्णमहोत्सवी शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शास्त्रीय गायिका परवीन सुलताना यांचे गायन
दरबार हॉल येथे राज्यपालांच्या उपस्थित झालेल्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी विख्यात शास्त्रीय गायिका परवीन सुलताना यांचे गायन ऐकले. सर्व मुलांनी भारतीय बैठकीत बसून गायन ऐकले. परवीन सुलताना यांना मुकुंदराज देव (तबला) व श्रीनिवास आचार्य (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.