भेसळखोरांवर ‘एफडीए’चा बडगा
६७.२० कोटी रुपयांचा खाद्यसाठा जप्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त आणि असुरक्षित खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. जून ते ऑगस्ट २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत मुंबईसह संपूर्ण राज्यातील खाद्यपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या १२,०८३ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली.
नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ५,२६९ प्रतिष्ठानांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर ६०३ प्रतिष्ठानांचे परवाने निलंबित करण्यात आले. या कारवाईदरम्यान सुमारे ६७.२० कोटी रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. एफडीएच्या तपासणीत अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि इतर खाद्य प्रतिष्ठानांमध्ये प्राथमिक स्वच्छतेच्या नियमांचेही पालन होत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. जून ते ऑगस्टदरम्यान १,८०३ हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि क्लबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९४८ प्रतिष्ठानांना सुधारणा नोटिसा, तर १९९ प्रतिष्ठानांचे परवाने निलंबित करण्यात आले.
तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची आणि योग्य ड्रेनेजची व्यवस्था नसल्याचे आढळले. रेफ्रिजरेटरमध्ये खाद्यपदार्थांसाठी आवश्यक तापमान राखले जात नव्हते. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झुरळांचा प्रादुर्भाव आढळला. खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अस्वच्छ पद्धतींचा वापर होत असल्याचेही निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचे तसेच प्रशिक्षणाचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे अनेक ठिकाणी आढळले. काही प्रतिष्ठानांमध्ये कच्चे चिकन उघड्या भांड्यांमध्ये ठेवण्यात आले होते, तर कापलेल्या भाज्यांचीही योग्य पद्धतीने साठवणूक केली जात नव्हती. त्यामुळे कच्चे आणि तयार खाद्यपदार्थ यांच्यातून संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला होता. याशिवाय अस्वच्छ फरशी, खराब ड्रेनेज, भिंतींचे उखडलेले प्लास्टर तसेच घाणेरड्या भांड्यांवर खाद्यपदार्थांचे अवशेष आढळून आले.
दूध डेअरीपासून मिठाई आणि खाद्यतेलापर्यंत कारवाई
दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांच्या ९,४८५ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४,३२१ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर ४०४ प्रतिष्ठानांचे परवाने निलंबित करण्यात आले. या कारवाईत दूध व दुग्धजन्य पदार्थांचा सुमारे ५.४० कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. दरम्यान, खाद्यतेल, आंबे, लाडू, खवा, बेकरी उत्पादने, कँडी, गूळ, तूप, खजूर, आईस्क्रीम-कुल्फी, फ्रोझन डेझर्ट, मसाले, सुपारी आणि ताडी इत्यादी खाद्यपदार्थांबाबत ६९६ छापे टाकण्यात आले. या कारवाईत सुमारे ४२.१७ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
गुटखा-पानमसाल्यावरही कारवाईचा बडगा
बंदी असलेल्या पानमसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू आणि इतर प्रतिबंधित खाद्यपदार्थांविरोधातही एफडीएने कठोर कारवाई केली. या प्रकरणांमध्ये ६४४ एफआयआर दाखल करण्यात आले असून, ८६७ जणांना अटक करण्यात आली. तसेच ४८३ दुकाने सील करण्यात आली. या कारवाईदरम्यान प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा सुमारे १९.६२ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त व असुरक्षित खाद्यपदार्थांची विक्री रोखण्यासाठी एफडीएने तपासणी आणि कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.