एनएसईचा आयपीओचा किंमतपट्टा निश्चित
मुंबई, ता. ११ : नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा बहुचर्चित २२,५६२ कोटी रुपयांचा आयपीओ १७ ते २१ सप्टेंबरदरम्यान बाजारात येत असून, यासाठी १,७०० ते १,७८५ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे एमडी व सीईओ आशीष कुमार चौहान यांनी एक्स्चेंजच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येथील एनएसईच्या सभागृहात आज ही माहिती दिली. एक रुपये दर्शनी मूल्याच्या या शेअरची १,७८५ ही किंमत निश्चित झाल्यास एनएससीचे मूल्यांकन ४.४२ लाख कोटी रुपये एवढे होईल. या इशूमध्ये स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड आणि मॉरिशसची अरांडा इन्व्हेस्टमेंट यांच्यातर्फे एकूण १२ कोटी ६४ लाख शेअर विक्रीला काढले जातील. यापूर्वी १४ कोटी ८९ लाख शेअर विक्रीला काढले जाणार होते; मात्र नंतर ती संख्या कमी करण्यात आली.
या आयपीओमधील ७० कोटी रुपयांपर्यंतचे शेअर एनएसईच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत. त्यांना १७० रुपये सवलत देऊन हे शेअर मिळतील. या इशूमध्ये गुंतवणूकदारांना किमान आठ शेअरसाठी व त्यापुढे आठ शेअरच्या पटीत अर्ज करावा लागेल. म्हणजेच त्यांची किमान गुंतवणूक १४,२८० रुपये आणि कमाल गुंतवणूक एक लाख ९९ हजार ९२० रुपये राहील.
एनएसई हे भारतातील सर्वांत मोठे स्टॉक एक्स्चेंज आहे, तर जागतिक शेअर व्यवहारांमधील एनएसईचा वाटा ११.३८ टक्के आणि शेअर डेरिव्हेटिव्ह व्यवहारांमधील त्यांचा वाटा ५१.१८ टक्के आहे. आयुर्विमा महामंडळाकडे एनएसईचे सर्वांत जास्त म्हणजे १०.७२ टक्के शेअर आहेत.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात एनएसईला १०,३०२ कोटी रुपये नफा झाला. मागील वर्षापेक्षा तो १५.५ टक्के कमी होता. या वर्षी त्यांना मिळालेला महसूलही मागील वर्षीपेक्षा ३.१ टक्के घटून १६,६०१ कोटी रुपये झाला. या वर्षीच्या जूनअखेरीच्या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा ६.७ टक्के वाढून ३,१२० कोटी रुपये झाला, तर महसूलही १३ टक्के वाढून ४,५६० कोटी रुपये झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.