मुंबई, ता. १६ : रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह करण्यासाठी ‘नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित राज्यव्यापी मद्य व अमली पदार्थ तपासणी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. ११) मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस एसटी महामंडळ तसेच परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अभियानाच्या माध्यमातून नशेच्या प्रभावाखाली वाहन चालविण्यास प्रतिबंध करण्यासोबतच जनजागृती, नियमित तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय, उपचार व पुनर्वसन यांचा समन्वय साधण्यात येणार आहे. सुरक्षित वाहतूक व्यवस्था ही शासनाच्या प्राधान्यक्रमांपैकी एक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी सुरक्षित आणि सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. २०२६ ते २०२९ या कालावधीत विविध प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक सेवांमध्ये एकात्मिक तपासणी व्यवस्था लागू करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती व मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यात येणार आहेत.
विविध वाहतूक सेवांचा समावेश
प्रस्तावित ‘नशामुक्त एसटी महामंडळ’ अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महापालिका बससेवा, शासकीय वाहने, सार्वजनिक उपक्रम तसेच शासनासाठी कार्यरत कंत्राटी वाहनांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खासगी बस, पर्यटन वाहने, टॅक्सी, ॲपआधारित कॅब, ऑटोरिक्षा आणि कंत्राटी प्रवासी वाहतूक सेवांमध्येही तपासणी व्यवस्था लागू करण्याचे नियोजन असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
तपासणीसाठी विशेष किट
अमली पदार्थांची प्राथमिक स्तरावर तत्काळ तपासणी करता यावी, यासाठी विकसित करण्यात आलेल्या विशेष तपासणी किटच्या चाचण्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. या किटचा राज्यात प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री सरनाईक यांनी सांगितले.
मुंबई : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.