मालमत्ता खात्यातील सफाई कामगारांना पदोन्नतीची मागणी
दुसरी, तिसरी कालबद्ध पदोन्नती देण्याची कर्मचारी संघटनेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : ‘आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांना देण्यात येणाऱ्या कालबद्ध पदोन्नतीच्या धर्तीवर मालमत्ता खात्यातील सफाई कामगार कर्मचाऱ्यांनाही दुसरी व तिसरी कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी,’ अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापालिका उपआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांच्याकडे केली आहे.
आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत सफाई कामगारांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देताना विहित शैक्षणिक अर्हता, म्हणजे सातवी उत्तीर्णची अट शिथिल करण्याचे महापालिकेने जाहीर केले होते, मात्र या धोरणामध्ये पहिली व दुसरी पदोन्नती याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने अनेक सफाई कामगारांना दुसरी कालबद्ध पदोन्नती नाकारण्यात आली होती. यासंदर्भात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर पहिली, दुसरी आणि तिसरी कालबद्ध पदोन्नती देताना एकसूत्रता आणण्यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन खाते आणि मालमत्ता खाते या दोन्ही विभागांतील सफाईगार कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप व सेवाशर्ती एकसमान आहेत. तसेच दोन्ही विभागांतील सफाई कामगार लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार मिळणाऱ्या लाभांचे लाभार्थी आहेत. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन खात्यासाठी जारी करण्यात आलेले परिपत्रक मालमत्ता खात्यातील सफाईगार कर्मचाऱ्यांनाही लागू करणे आवश्यक असल्याचे युनियनचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी म्हटले. त्यामुळे मालमत्ता खात्यातील सफाईगार कर्मचाऱ्यांना दुसरी व तिसरी कालबद्ध पदोन्नती तातडीने मंजूर करावी, तसेच ज्या तारखेपासून ही पदोन्नती अनुज्ञेय ठरेल, त्या तारखेपासूनची सर्व थकबाकी कर्मचाऱ्यांना अदा करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.