घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) : १९९३च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातून बचावलेल्या सुधीर मोहिते यांच्या शरीरात तब्बल ३३ वर्षांपासून बॉम्बस्फोटातील तुकडा असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना एमआरआय तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. डॉक्टरांनी ११ सप्टेंबरला शस्त्रक्रिया करून हा तुकडा यशस्वीपणे बाहेर काढला.
१२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांपैकी एका स्फोटाच्या वेळी मोहिते हे वरळी पासपोर्ट कार्यालयासमोरील मॉडर्न हॉटेल परिसरातून जाणाऱ्या १७२ क्रमांकाच्या बसमध्ये प्रवास करत होते. याच परिसरात स्कूटरमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला होता. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. मोहिते यांच्या गालाला या स्फोटात दुखापत झाली होती. गालावर काळ्या खड्ड्यासारखी जखम झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात नेऊन उपचार करून घेतले होते.
त्यानंतर ३३ वर्षे या जखमेमुळे त्यांना कोणताही त्रास झाला नाही, मात्र सौम्य ब्रेन स्ट्रोक आल्याने ८ सप्टेंबरला ते हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले. उपचारादरम्यान एमआरआयसाठी मशीनमध्ये गेल्यानंतर असामान्य आवाज येऊ लागल्याने त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. पुढील तपासणीत ओठाच्या वरील भागातील गाठ नसून जुना धातूचा तुकडा असल्याचे आढळले.
हा तुकडा नेमका कोणत्या धातूचा आहे आणि तो १९९३च्या स्फोटातीलच अवशेष आहे का, यासाठी तो संशोधनासाठी पाठविण्यात येणार आहे.
मला ब्रेन स्ट्रोक आल्याने मुंबईतील एका रुग्णालयात दाखल झालो. त्या वेळी एमआरआय करताना मशीनमध्ये आवाज येत असल्याने पुन्हा बाहेर काढले. बॉम्बस्फोटादरम्यान मला गालावर दुखापत झाली होती त्या वेळी मी ‘शुश्रूषा’मध्ये ड्रेसिंग करून घरी परतलो. त्यानंतर मला गालावर गाठ सारखे जाणवत होते, मात्र ३३ वर्षे फारसा काही त्रास जाणवला नाही. ब्रेन स्ट्रोक आल्याने मी रुग्णालयात दाखल झालो त्या वेळी एमआरआय करताना ही बाब समोर आली.
- सुधीर मोहिते, रुग्ण
मुंबई : शस्त्रक्रिया करून बॉम्बस्फोटातील तुकडा बाहेर काढण्यात आला.