घाटकोपरच्या राजगड, रायगड झोपडपट्टीचा होणार कायापालट
१५ वर्षांची प्रतीक्षा संपणार; शिवशाहीला विकसक म्हणून नेमा, रहिवाशांचा एसआरएला प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : दीड दशकांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या घाटकोपर पश्चिम येथील अमृतनगरच्या राजगड आणि रायगड सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या झोपडपट्टीचा कायापालट होणार आहे. १५ वर्षांपासून प्रकल्प रखडवून ठेवलेल्या विकसकाला एसआरए प्राधिकरणाने बाद ठरवत प्रकल्प काढून घेतल्यानंतर आता नव्याने विकसकाची नियुक्ती केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी विकसक म्हणून शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव एसआरएला दिला आहे. तसेच शिवशाहीनेही सदरचा प्रकल्प करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सदरचा प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे.
घाटकोपर अमृतनगर येथील राजगड, रायगड सहकारी गृहनिर्माण सोसायटी अंतर्गत सुमारे ३१० झोपड्या असून, त्यांचा पुनर्विकास व्हावा म्हणून संबंधित झोपडीधारकांनी १५ वर्षांपूर्वी विकसकाची नियुक्ती केली होती. त्यानुसार विकसकाने काम सुरू केले होते, मात्र आर्थिक अडचणींमुळे प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे गेल्या दीड दशकापासून रहिवासी संक्रमण शिबिरात वास्तव्यास आहेत. वेगवेगळ्या स्तरावर विकसकाकडे पाठपुरावा करूनही प्रकल्प पूर्ण केला जात नसल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्याची दखल घेत एसआरए प्राधिकरणाने महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ मधील कलम १३(२) अन्वये एसआरएने कारवाई करत विकसकाकडून प्रकल्प काढून घेतला आहे. त्यानुसार रहिवाशांनी आता शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून प्रकल्प मार्गी लावण्याच्या हलचाली सुरू केल्या शिवशाहीची विकसक म्हणून नियुक्ती करावी, असा प्रस्ताव एसआरएला दिल्याची माहिती शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यानुसार एसआरएने सदर प्रस्तावाला मंजुरी दिल्यास आम्ही तत्काळ प्रकल्प हाती घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सहा हजार चौरस मीटरचा भूखंड
राजगड आणि रायगड सोसायट्यांमध्ये ३१० झोपड्या असून, त्यांचा भूखंड सुमारे सहा हजार चौरस मीटर म्हणजे दीड एकराचा आहे. त्या ठिकाणी नियमानुसार सुमारे तीन लाख चौरस फुटांचे बांधकाम करता येणार आहे. त्यापैकी सुमारे एक लाख चौरस फुटांचे क्षेत्रफळ पुनर्वसन सदनिकांसाठी द्यावे लागेल, तर उर्वरित जवळपास दोन लाख चौरस फुटांचे क्षेत्रफळ विक्रीयोग्य उपलब्ध होऊ शकणार आहे.
१५० कोटींचा खर्च, तीन वर्षांत काम पूर्ण करणार
शिवशाहीने सदरचा पुनर्विकास प्रकल्प ताब्यात घेतानाच तो पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. सदर प्रकल्पांतर्गत २१-२२ मजली इमारती उभारण्याचे नियोजन आहे. कंत्राटदाराची नियुक्ती करून सदरचे काम केले जाणार आहे.
- ३१० झोपड्या
- ६,००० चौरस फुटांचा भूखंड
- २१-२२ मजली इमारती उभारण्याचे नियोजन
- ३ लाख चौरस फुटांचे बांधकाम शक्य
- १५० कोटींचा खर्च
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.