१,२३९ मंडळांना ऑनलाइन परवानगी
गणेशोत्सवासाठी मुंबई अग्निशामक दल सज्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : गणेशोत्सवादरम्यान मुंबईत आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई अग्निशामक दलाने कडक पावले उचलली आहेत. अग्निशामक दलाचे अधिकारी आता प्रत्यक्ष गणेश मंडपांना भेटी देऊन आयोजक व स्वयंसेवकांना आगीपासून बचावाचे प्रात्यक्षिक व धडे देणार आहेत. यासह मंडपांमधील अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर करडी नजर ठेवली जाणार असून, यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक लवकरच जारी केले आहे. दरम्यान, गणेशोत्सव मंडळांच्या सुविधेसाठी पालिकेने ‘एक खिडकी ऑनलाइन प्रणाली’ सुरू केली आहे. १३ सप्टेंबरच्या मुदतीपर्यंत १,२३९ मंडळांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये नवीन मंडळांना एक वर्षासाठी, तर जुन्या मंडळांना सलग पाच वर्षांसाठी परवाना देण्यात आला आहे.
उत्सवाच्या काळात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक अग्निशामक केंद्रावर पाच जवानांचे विशेष पथक २४ तास तैनात ठेवले जाणार आहे. हे पथक कोणत्याही आणीबाणीच्या वेळी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य हाती घेईल. अग्निसुरक्षेबाबत कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मंडपांमधील गर्दी लक्षात घेता प्रत्येक गणेश मंडपात अग्निशामक सिलिंडर ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सिलिंडरचा योग्य वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण स्वयंसेवकांना दिले जाईल. शॉर्टसर्किटचा धोका टाळण्यासाठी मंडपातील वायरिंग सुरक्षित असणे आवश्यक आहे. उघड्या तारा किंवा धोकादायक जोडण्या आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. मंडपात समई किंवा दिवे ठेवण्याच्या ठिकाणचा पृष्ठभाग कठीण असावा. दिव्यांच्या आसपास कोणतीही सोप्या रीतीने पेट घेणारी ज्वलनशील सामग्री ठेवण्यास सक्त मनाई आहे.
दरम्यान, मोठ्या मूर्तींच्या आगमन व विसर्जन मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. आगमन मार्गात खड्डे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा अतिरिक्त आयुक्त डॉ. अभिजित बांगर यांनी दिला आहे. तसेच मूर्तींच्या सुलभ वाहतुकीसाठी झाडांच्या फांद्या छाटण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी उद्यान विभागाला दिले आहेत.
..
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रत्येक अग्निशामक केंद्रावर विशेष पथके सज्ज ठेवली आहेत. तसेच दररोज किमान पाच गणेश मंडपांना प्रत्यक्ष भेटी देऊन आयोजकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
- रवींद्र आंबुलगेकर, मुख्य अग्निशामक अधिकारी
.........