दिंडोशीत बेस्ट कंत्राटी बस मेट्रोच्या खांबाला धडकली
दोन प्रवासी जखमी; चालकावर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : गोरेगाव पूर्वेतील ओबेरॉय मॉलसमोरील सिग्नलजवळ एका खासगी कारला घासून बेस्टची कंत्राटी बस थेट मेट्रोच्या खांबाला धडकल्याची घटना घडली. सोमवारी (ता. १४) सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या या अपघातात बसमधील दोन प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताप्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मातेश्वरी ट्रॅव्हल्सची दिंडोशी डेपोतील बस ही मार्ग क्रमांक ७०५ वरून दिंडोशी डेपो ते भाईंदर स्टेशन (पूर्व) दरम्यान धावत होती. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ओबेरॉय मॉलसमोरील सिग्नलवर उड्डाणपुलाखाली उजवे वळण घेत असताना, बसने एका खासगी कारच्या (एमएच-४७-बीपी-६४८३) मागील उजव्या बाजूला घासले आणि त्यानंतर बस थेट मेट्रो रेल्वेच्या खांबाला जाऊन धडकली.
या धडकेत बसमधील दोन प्रवासी जखमी झाले. राजेंद्र मुरलीधर सोनवणे (वय ५८), दिंडोशी डेपोतील बेस्टच्या अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी असून, सोनवणे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना तीन टाके पडले आहेत. तर मंगेश रामचंद्र मोडलेकर (वय ५७) हे प्रवासी असून, यांच्या हनुवटीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या हनुवटीवर एक आणि डोक्यावर पाच टाके लागले आहेत.
अपघातानंतर तत्काळ मातेश्वरीचे अपघात निरीक्षक कुलकर्णी यांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी जोगेश्वरी (पूर्व) येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार आणि टाके घातल्यानंतर रात्री दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच वनराई पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राहुल दाडस यांच्या सूचनेनुसार अपघातग्रस्त बस बेस्टच्या टोईंग वाहनाने वनराई पोलिस ठाण्यासमोर आणून उभी करण्यात आली. खासगी कारचालकाने दिलेल्या तक्रारीवरून बसचालकाविरुद्ध वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.