मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली
दोन दिवसांच्या पावसाने सात तलावांमध्ये ९८ टक्के साठा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असतानाच दोन दिवसांत मुंबई आणि उपनगरांसह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख तलावांमधील उपयुक्त पाणीसाठा ९७.९४ टक्क्यांवर (सुमारे ९८ टक्के) पोहोचला आहे. एकूण पाणीसाठा १४,१७,५८४ दशलक्ष लिटर नोंदवला गेला आहे. शनिवार आणि रविवारी झालेल्या समाधानकारक पावसामुळे या वर्षाची पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी या सात तलावांची एकूण साठवण क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर आहे. सध्या त्यात ९७.९४ टक्के पाणी जमा झाले आहे. मुंबईला सर्वाधिक पाणी देणारा भातसा तलाव (क्षमता : ७,१७,०३७ दशलक्ष लिटर) पूर्ण १०० टक्के भरला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये भातसा तलाव पूर्ण भरला होता. त्यानंतर चालू वर्षी तलावाने १०० टक्क्यांची पातळी गाठली आहे.
मुंबई शहराला दररोज सुमारे ३,९०० ते ३,९५० दशलक्ष लिटर तर ठाणे, भिवंडी आणि लगतच्या ग्रामीण भागासह एकूण ४,१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.
पाणीसाठ्यात आणखी वाढ शक्य
मॉन्सूनचा निरोप घेताना म्हणजेच १ ऑक्टोबरला तलावांमध्ये १०० टक्के साठा असल्यास पुढील पावसाळ्यापर्यंत (३५३ दिवस) पाण्याचे नियोजन सुरळीत राहते. सध्याचा साठा ९८ टक्क्यांवर पोहोचल्याने मुंबई वर्षभराच्या कोट्याची पूर्तता करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पालिकेने जारी केलेल्या अहवालानुसार, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आवक सुरू असल्याने पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.