लालबागच्या गर्दीवर रेल्वे पोलिसांचा वॉच
चिंचपोकळी, करी रोडवर २१९ आरपीएफ जवानांसह ५५ तिकीट तपासनीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : लालबागचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी गणेशोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. या दोन्ही स्थानकांवर २१९ आरपीएफ जवान आणि ५५ तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गर्दी नियंत्रणासह विनातिकीट प्रवाशांवर कारवाईची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची आणि उपनगरीय प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने आरपीएफ, लोहमार्ग पोलिस आणि स्थानिक पोलिसांचा संयुक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नियमित तीन हजार ५०० पोलिसांव्यतिरिक्त ४५० गृहरक्षकांची अतिरिक्त कुमक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष रेल्वेगाड्या आणि गर्दी नियंत्रणासाठी सुमारे २५० अधिकारी, कर्मचारी व गृहरक्षकांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे.
सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, पनवेल, दिवा, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि कल्याण स्थानकांवरही बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळल्यास आरपीएफ, लोहमार्ग पोलिस, स्थानक व्यवस्थापन किंवा १३९ या मदतवाहिनीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्वान पथकांद्वारे तपासणी
मुंबईतील १३९ उपनगरीय स्थानकांवर दररोज ७५ ते ८० लाख प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि स्थानकांवर श्वान पथकांकडून तपासणी केली जात आहे. बेल्जियन मालिनोआ, लॅब्राडोर रिट्रिव्हर, जर्मन शेफर्ड आणि डोबरमन या प्रशिक्षित श्वानांचा वापर स्फोटके, अमली पदार्थ आणि संशयास्पद वस्तू शोधण्यासाठी केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.