संशोधन, तंत्रज्ञान क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव
आयआयटी मुंबईत राष्ट्रीय अभियंता दिन उत्साहात
मुंबई, ता. १५ : आयआयटी मुंबईत मंगळवारी (ता. १५)राष्ट्रीय अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अभियांत्रिकी, संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि संस्थात्मक योगदानासाठी विविध प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. या वेळी त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचे स्मरण करण्यात आले. आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी अभियंता समुदायाला राष्ट्रीय अभियंता दिनाच्या शुभेच्छा देताना समाजाच्या शाश्वत विकासासाठी अभियंत्यांनी नावीन्यपूर्ण उपाय शोधण्याची गरज व्यक्त केली. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या अभियंत्यांचे उदाहरण देत त्यांनी विविध घटकांशी सहकार्य करून शाश्वत विकास साधण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लार्सन अँड टुब्रो लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रह्मण्यन यांनी ऊर्जा संक्रमण, डिजिटल परिवर्तन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि स्थानिकीकरण या क्षेत्रांत युवा अभियंत्यांसमोर मोठ्या संधी असल्याचे सांगितले. संशोधन, तंत्रज्ञान, त्याचा प्रत्यक्ष वापर, विस्तार आणि सामाजिक परिणाम हे भविष्यात महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. युवा अभियंत्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष समस्या सोडविण्यासाठी उद्योग-व्यवसाय उभारावेत आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
--
विविध प्रतिष्ठित पुरस्कारांचे वितरण
राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने आयआयटी मुंबईतर्फे आयआयटी मुंबई इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर एक्सेलनेस इन रिचर्स इन इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, डॉ. पी. के. पटवर्धन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अवॉर्ड २०२५, प्रो. एस. एल. मेहेंदिरत्ता अवॉर्ड, आणि बेस्ट झोनल वर्क अवॉर्ड प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांद्वारे संशोधन, तंत्रज्ञानातील नावीन्य, अभियांत्रिकी तसेच संस्थात्मक विकासातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.