एनसीएमसी कार्डची सक्ती नाही
३० सप्टेंबरपर्यंत पुढे; महिला, ज्येष्ठांना जुन्या पद्धतीने तिकीट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे तिकीट मिळविण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य करण्याचा निर्णय महामंडळाने तूर्तास पुढे ढकलला आहे. १ सप्टेंबरपासून लागू झालेली कार्डची सक्ती आता ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे.
एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्यानंतर डिजिटल तिकीट प्रणालीवर प्रवाशांचा मोठा भार पडला. त्यामुळे एसटीच्या सर्व्हरवर ताण येऊन वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. सर्व्हर डाऊन होणे, तसेच मोठ्या प्रमाणात ‘हिट्स’ वाढल्याने वाहकांना सवलतीची तिकिटे देताना अडचणी येत होत्या. परिणामी बस स्थानकांवर आणि बसमध्ये प्रवाशांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर महामंडळाने कार्ड सक्तीला मुदतवाढ दिली आहे.
ओळखपत्रावर मिळणार सवलत
३० सप्टेंबरपर्यंत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीप्रमाणे आधार कार्ड किंवा अन्य अधिकृत ओळखपत्र दाखवून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. त्यासाठी एनसीएमसी कार्ड असणे बंधनकारक राहणार नाही. महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी परिपत्रक क्रमांक ५५४४ जारी करून याबाबत सूचना दिल्या आहेत.
सक्रिय कार्डधारकांना कार्डचा पर्याय
ज्या प्रवाशांकडे आधीपासून सक्रिय एनसीएमसी कार्ड आहे, त्यांना सवलतीच्या तिकिटासाठी त्याच कार्डाचा वापर करता येणार आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना जुन्या पद्धतीने ओळखपत्रावर किंवा सक्रिय एनसीएमसी कार्डद्वारे सवलतीचे तिकीट घेता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.