गणेशोत्सवात मुंबईकडे कूच करू नका
चर्चेतून प्रश्न सोडवूया मंत्री ॲड. आशीष शेलार यांचे जरांगेंना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : गणेशोत्सव आणि गौरी उत्सवाच्या काळात मुंबई, पुण्यासह राज्यभरात गणेशभक्तांची मोठी गर्दी असते. या काळात नागरिकांना अथवा गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास, अडचण किंवा असुविधा होऊ नये, यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी बुधवारी येथे केले.
मराठा समाजाच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढता येईल, असे सांगत महायुती सरकार उर्वरित प्रश्नांवरही चर्चा करण्यास तयार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत ॲड. शेलार म्हणाले, की महायुती सरकारने मराठा समाजाच्या १४ पैकी १३ मागण्या पूर्ण केल्या आहेत. एसईबीसीसंदर्भातील निर्णय, ईडब्ल्यूएस संधी, शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण, विशेष कायदा, जात प्रमाणपत्र पडताळणी सुलभ करणे आणि इतर अनेक महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत. तसेच ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व निर्वाह भत्त्याचे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. उर्वरित मागण्यांवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ गट सकारात्मकतेने काम करीत आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील सरकारविरोधी वक्तव्यांवर शेलार यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘आपली भूमिका मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल वापरली जाणारी अपमानास्पद भाषा अजिबात मान्य करता येणार नाही. मतभेद असू शकतात, पण व्यक्तींचा अपमान करणे योग्य नाही,’’ असे त्यांनी सुनावले.
प्रकृतीची काळजी घ्यावी
मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करताना शेलार म्हणाले, ‘‘सरकारला जरांगे यांच्या आरोग्याची काळजी आहे. त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि टोकाची भूमिका न घेता चर्चेचा मार्ग स्वीकारावा. महायुती सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केले नाहीत.’’ सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.