पर्यावरण रक्षणाचा दावा कागदावरच
कांजूरगाव पुनर्विकासात ३९ झाडांवर चालणार कुऱ्हाड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : कांजूरगाव येथील एल.बी.एस. मार्गावरील एका प्रस्तावित इमारतींच्या पुनर्विकासाचा फटका परिसरातील हिरवळीला बसणार आहे. या प्रकल्पात एकूण ३९ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार असून, यातील २४ झाडे पूर्णपणे तोडली जाणार आहेत, तर १५ झाडांचे पुनर्रोपण (ट्री ट्रान्सप्लांटेशन) केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे. बाधित होणाऱ्या झाडांमध्ये जांभूळ, नारळ, अशोक, बदाम, उंबर, आंबा, पिंपळ, बेल आणि कडुनिंब यांसारख्या अनेक वर्षांपासून वाढलेल्या देशी आणि औषधी प्रजातींचा समावेश आहे.
वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, तोडल्या जाणाऱ्या आणि पुनर्रोपित केल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात एकूण ७०७ नवीन झाडे लावण्याची अट घालण्यात आली आहे. यामध्ये तोडलेल्या झाडांच्या बदल्यात ४३० झाडे आणि पुनर्रोपित झाडांच्या बदल्यात २७७ झाडे लावायची आहेत. उपलब्ध जागेत पारंपरिक तसेच ‘मियावाकी’ पद्धतीने ही झाडे लावली जातील. झाडांची प्रजाती आणि योग्य अंतर राखून ही रोपे लावणे व त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित विकसकावर (डेव्हलपर) असणार आहे.
नंतरच प्रस्तावाला अंतिम मंजुरी
वृक्ष प्राधिकरणाकडून या प्रस्तावाची तांत्रिक पाहणी केली जात असून, पर्यावरणावर होणारा परिणाम, झाडांचे वय व स्थिती यांचा विचार केला जात आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांची दखल घेतल्यानंतरच या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली जाईल, असे प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.