गणेश विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज ठेवा
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य; कृत्रिम तलाव, निर्माल्य संकलनावर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : श्रीगणेशमूर्ती विसर्जन प्रक्रियेदरम्यान गणेशभक्त व सार्वजनिक मंडळांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा सुसज्ज ठेवाव्यात. सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देतानाच पर्यावरण संवर्धनावर विशेष भर द्यावा, असे निर्देश महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले.
आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी (ता. १६) स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) आणि दादर चौपाटी विसर्जनस्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील नागरी सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि गर्दीच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.
आयुक्त अश्विनी भिडे यांनी या वेळी महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. विसर्जनस्थळांवर पुरेशा संख्येने तराफे, क्रेनची मोफत सुविधा, निरीक्षण मनोरे, आपत्कालीन प्रकाशव्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय असावी. मिरवणुकांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून अंथरलेल्या स्टील प्लेट्स सुस्थितीत ठेवाव्यात, जल सुरक्षेसाठी पुरेसे प्रशिक्षित जीवरक्षक तैनात करावेत. तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी. समुद्रकिनारे स्वच्छ व कचरामुक्त राखण्यासाठी यंत्रणेने सतत कार्यरत राहावे, लहान मूर्तींच्या विसर्जनासाठी जास्तीत जास्त कृत्रिम तलावांचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यावे, समुद्र किंवा नदीपात्रात निर्माल्य न फेकता ते केवळ ‘निर्माल्य कलशात’च जमा केले जाईल, यादृष्टीने जनजागृती करावी, असे स्पष्ट आदेशही आयुक्तांनी या वेळी दिले.
या पाहणी दौऱ्यात उपायुक्त प्रशांत गायकवाड, उपायुक्त चंदा जाधव, उपायुक्त तसेच श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे आणि जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आपापसांत समन्वय राखावा!
संकलित निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे. विसर्जन प्रक्रिया सुरळीत, शिस्तबद्ध आणि अपघातमुक्त पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपापसांत समन्वय राखून काम करावे.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.