‘बिजली’च्या गर्जना आता आठवणीत
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघिणीचे निधन; वन्यजीवप्रेमींना हळहळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेली वाघीण बिजलीची प्रकृती वृद्धापकाळाशी संबंधित आरोग्यविषयक समस्यांमुळे गेल्या काही काळापासून खालावत होती. तिचा बुधवारी (ता. १६) रात्री ९.४५ वाजता मृत्यू झाला. ती १८ वर्षे ४ महिन्यांची होती.
उद्यान प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यापासून बिजलीच्या आहाराचे प्रमाण हळूहळू कमी झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर तिच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तसेच पश्चिम महाराष्ट्रातील तांत्रिक पशुवैद्यकीय सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाने तिला आवश्यक उपचार आणि सहाय्यक वैद्यकीय सेवा देण्यात आल्या, मात्र वैद्यकीय पथकाच्या प्रयत्नांनंतरही तिचे निधन झाले.
बिजलीला ११ जुलै २०१६ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. त्यानंतर १० वर्षांहून अधिक काळ ती उद्यानाच्या देखरेखीखाली होती. या काळात लाखो पर्यटकांनी तिचे दर्शन घेतले. उद्यानातील पशुवैद्यकीय आणि देखभाल पथकासाठीही ती विशेष जिव्हाळ्याची होती.
बिजलीच्या दीर्घ वास्तव्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन्यजीव व्यवस्थापन, संवर्धनविषयक जनजागृती आणि प्राण्यांच्या देखभालीच्या प्रयत्नांमध्ये तिचे महत्त्वाचे स्थान राहिले. प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार तिचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झाला असला, तरी मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी नियमानुसार शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने बिजलीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत तिच्या वन्यजीव संवर्धनातील योगदानाला आदरांजली वाहिली आहे.
फोटो आणि आठवणी सोशल मीडियावर शेअर करा
बिजलीच्या आठवणी जपण्यासाठी वन्यजीवप्रेमींनी तिच्यासोबतचे फोटो आणि आठवणी सोशल मीडियावर शेअर कराव्यात, असे आवाहन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.