कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाला दिवाळीचा मुहूर्त
म्हाडा आणि विकसकाकडून सी अँड डीए करारावर स्वाक्षऱ्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला म्हणजे कामाला सुरुवात होणार असल्याचे निश्चित झाले आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत बांधकाम आणि विकास संस्थेच्या माध्यमातून (सी अँड डीए) पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी भगीरथी हाउसिंग प्रा. लि. आणि माथी डेव्हलपर्स यांच्यासोबत आज सी अँड डीए करार करण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत नियोजनाच्या टप्प्यात असलेल्या या प्रकल्पाने आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि विकसक कंपनीचे संचालक अतुल गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. विकसक आणि म्हाडामध्ये झालेल्या या करारामुळे कामाठीपुराच्या पुनर्विकासाने नियोजनाच्या टप्प्यातून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. नागरिकांचे सुरक्षित, सन्मानजनक आणि आधुनिक जीवनमान हे या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असून, कामाठीपुराची ऐतिहासिक ओळख जपत येथे आधुनिक, शाश्वत आणि नागरिककेंद्रित परिसर उभारण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीच्या माध्यमातून हा प्रकल्प पुढे नेला जाईल, असेही ते म्हणाले. या वेळी म्हाडा वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच मे. भागीरथी हाउसिंग प्रा. लि. व मे. माथी डेव्हलपर्स प्रा. लि.चे संचालक व विकसकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
८००१ निवासी व व्यावसायिक भाडेकरू
सुमारे ३४ एकर क्षेत्रात, गल्ली क्रमांक १ ते १५ मध्ये प्रस्तावित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सुमारे ४७५ उपकरप्राप्त आणि २५९ बिगर-उपकरप्राप्त इमारतींचा समावेश आहे. उपलब्ध प्रकल्प आराखड्यानुसार सुमारे ८,००१ निवासी व व्यावसायिक भाडेकरू/रहिवासी, त्यामध्ये सुमारे ६,६२५ निवासी आणि १,३७६ बिगरनिवासी भाडेकरू, तसेच सुमारे ८०० जमीनमालक या प्रकल्पाशी संबंधित आहेत. अधिकृत प्रकल्प माहितीनुसार या भागातील भूखंड आकाराने लहान व अरुंद असल्यामुळे स्वतंत्र इमारतींच्या पुनर्विकासाऐवजी समूह पुनर्विकास हा एकात्मिक नियोजनासाठी योग्य पर्याय ठरतो.
भाडेकरूंना ५०० चौरस फुटांचे घर
या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यमान पात्र रहिवासी व भाडेकरूंचे नियोजित पुनर्वसन करण्यात येणार असून, पात्र निवासी भाडेकरूंना ५०० चौ.फु. क्षेत्रफळाच्या पुनर्वसन सदनिकांची तरतूद करण्यात आली आहे. व्यावसायिक गाळेधारकांच्या पुनर्वसनाचाही प्रकल्पात समावेश आहे. त्याचबरोबर कामाठीपुरा समूह पुनर्विकासातून म्हाडासाठी सुमारे ४४,००० चौ.मी. गृहसाठा उपलब्ध होणार असून, यामधून सुमारे ९०० अतिरिक्त गृहनिर्माण सदनिकांची निर्मिती प्रस्तावित आहे.
मनोरंजनासाठी खुली जागा, हरित क्षेत्र आणि बरेच काही
प्रस्तावित विकासामध्ये पुनर्वसन इमारतींसोबत निवासी व व्यावसायिक क्षेत्र, सार्वजनिक सुविधा, मनोरंजनासाठी खुल्या जागा, हरित क्षेत्र, अंतर्गत रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि आधुनिक नागरी पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे पुनर्वसनानंतर नागरिकांना केवळ नवीन घरे मिळणार नसून त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक सुविधा नियोजित पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
भूकंपरोधक बांधकाम
प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये आधुनिक व भूकंपरोधक बांधकाम तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक वास्तुरचना, पावसाच्या पाण्याचे संधारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, हरित क्षेत्रे, आधुनिक अग्निसुरक्षा व्यवस्था, लिफ्ट सुविधा आणि इतर आवश्यक सामाजिक व नागरी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.