गणपती विसर्जनासाठी १२ विशेष लोकल
अनंत चतुर्दशीला मध्यरात्री चर्चगेट-विरारदरम्यान सेवा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीसह शहरातील विविध भागांत होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष वाहतूक नियोजन केले आहे. विसर्जनानंतर घरी परतणाऱ्या भाविकांसाठी २५/२६ सप्टेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष धीम्या लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच, गिरगाव चौपाटी परिसरातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी चर्नी रोड स्थानकावरील लोकलच्या थांब्यांमध्येही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
२५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने गणेशभक्त विसर्जनासाठी येतात. विसर्जनानंतरची परतीची गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांना रात्रीच्या वेळी रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी अतिरिक्त लोकल चालविण्यात येणार आहेत. चर्चगेटहून विरारच्या दिशेने सहा आणि विरारहून चर्चगेटच्या दिशेने सहा, अशा एकूण १२ विशेष धीम्या लोकल धावतील.
अतिरिक्त पर्याय
चर्चगेटहून विरारच्या दिशेने रात्री १.१५, १.४५, २.१५, २.५५, ३.१५ आणि ३.४५ वाजता विशेष लोकल सुटतील, तर विरारहून चर्चगेटच्या दिशेने रात्री १२.१५, १२.३०, १.१०, १.३०, २ आणि ३ वाजता विशेष लोकल सुटतील. त्यामुळे विसर्जनानंतर उशिरा घरी परतणाऱ्या भाविकांना रात्रीच्या वेळी रेल्वे सेवेचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे.
चर्नी रोडवर ८४ लोकलला थांबा नाही
गिरगाव चौपाटी परिसरातील गर्दी आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन २५ सप्टेंबरला चर्नी रोड स्थानकावरील सेवांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ ते रात्री ११.३० या कालावधीत चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ८४ अप धीम्या लोकल चर्नी रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर थांबणार नाहीत. फलाट क्रमांक २ आणि ३ वरील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
३७ जलद लोकलला सर्व स्थानकांवर थांबा
२५ सप्टेंबरला सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या कालावधीत मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या ३७ जलद १२ डब्यांच्या लोकलला सर्व स्थानकांवर, चर्नी रोडसह, थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकल या कालावधीत धीम्या लोकलप्रमाणे धावतील. गर्दीचे विभाजन करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
काही १५ डब्यांच्या लोकलचे थांबेही रद्द
याशिवाय काही १५ डब्यांच्या लोकलला ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्स स्थानकांवर थांबा दिला जाणार नाही. विसर्जन मिरवणुकीदरम्यान स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची सुरक्षितता आणि गर्दीचे नियोजन सुरळीत राहावे, यासाठी पश्चिम रेल्वेने हे विशेष नियोजन केले आहे. प्रवाशांनी सुधारित सेवांची नोंद घेऊन रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.