जलवाहिन्यांवर अत्याधुनिक ‘बटरफ्लाय झडपा’
पाण्याची नासाडी थांबणार; पहिल्या टप्प्यात वांद्रे ते अंधेरीदरम्यान अंमलबजावणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबईतील प्रमुख जलवाहिन्यांमधून होणारी गळती, जलवाहिनी फुटल्यानंतर वाया जाणारे लाखो लिटर पाणी आणि दुरुस्तीदरम्यान लागणारा वेळ रोखण्यासाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मुख्य जलवाहिन्यांवर आता अत्याधुनिक ‘बटरफ्लाय झडपा’ बसवण्यात येणार आहेत. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी थांबणार असून पहिल्या टप्प्यात वांद्रे ते अंधेरीदरम्यान अंमलबजावणी केली जाईल.
मुंबई शहराला दररोज सुमारे ४,६५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात ४,१५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. अशा स्थितीत जलवाहिन्या फुटून अथवा गळती होऊन पाणी वाया जाणे परवडणारे नाही. सध्या वापरात असलेल्या पारंपरिक झडपा बंद करण्यासाठी मोठा कालावधी आणि जास्त मनुष्यबळ लागते. यामुळे जलवाहिनी फुटल्यास पाण्याचा प्रचंड प्रवाह थांबवेपर्यंत लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जाते. बटरफ्लाय झडपा ९० अंशांच्या कोनात अगदी सहज आणि कमी वेळेत फिरवून बंद किंवा सुरू करता येतात. जलवाहिनी फुटल्यास किंवा मोठी गळती झाल्यास पाण्याचा प्रवाह तातडीने रोखणे शक्य होणार आहे. पाणीप्रवाह त्वरित थांबल्यामुळे दुरुस्तीची कामे तातडीने आणि वेगाने हाती घेता येतील.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी या बटरफ्लाय झडपांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात आला होता. तो यशस्वी ठरल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात वांद्रे, खार, सांताक्रुझ, विलेपार्ले आणि अंधेरी या पश्चिम उपनगरांतील प्रमुख जलवाहिन्यांवर या झडपा बसवल्या जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबईतील मुख्य वाहिन्यांवर ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे.
नवी दिशा मिळेल
मुंबईकरांना पुरेशा आणि सुरळीत पाणीपुरवठ्यासोबतच पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम सभागृह नेते गणेश खणकर यांनी वेळोवेळी याबाबत आवाज उठवला होता. या निर्णयामुळे मुंबईच्या जल व्यवस्थापनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.