एसटीच्या सेवेला आधुनिकतेची जोड
नव्या व्होल्व्हो बस दाखल होणार ः सरनाईक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : खासगी आराम बस सेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्व्हो बस दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये १७० आसनी आणि ३० शयनयान बसचा समावेश आहे. यात सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा संगम या नव्या सेवेत पाहायला मिळणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या अनेक प्रवासी अधिक भाडे देऊन खासगी आराम बस सेवेला पसंती देतात. वातानुकूलित, आरामदायी आसनव्यवस्था, कमी प्रवास वेळ आणि रात्रीच्या प्रवासातील सुविधांमुळे खासगी आराम बसचा स्वतंत्र प्रवासी वर्ग निर्माण झाला आहे. त्यांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी केवळ पर्याय उपलब्ध करून न देता खासगी आराम बस सेवेच्या तोडीची आधुनिक, विश्वासार्ह आणि प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटीने ठेवले आहे.
==
रात्री शयनयानाची सुविधा
२५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी आरामदायी ४५ आसनी बस, तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
===
मोबाईलवरून तिकीट बुकिंग
एसटीच्या अधिकृत ऑनलाइन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही या बसचे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा देण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे प्रवाशांना बस स्थानकावर येऊन तिकीट काढण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलवरून बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घरबसल्या आरक्षण करता येणार आहे. डिजिटल तिकीट प्रणालीमुळे एसटीची आराम बस सेवा आधुनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेशी अधिक प्रभावीपणे जोडली जाणार आहे.
==
खासगी संस्थेकडून आतिथ्य व्यवस्थापन
प्रवाशांना केवळ आरामदायी बसच नव्हे, तर हाय-एंड प्रवासी सेवांचा अनुभव मिळावा, यासाठी नव्या व्होल्व्हो बसमधील आतिथ्य व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. प्रवाशांचे स्वागत, बसमधील मूलभूत सुविधा, स्वच्छता, प्रवाशांना आवश्यक माहिती आणि सेवा-सुविधांचे व्यवस्थापन यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे.
==
मार्गांचा सर्वंकष अभ्यास
महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य मार्गांवर खासगी आराम बस सेवेला मोठी मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष अभ्यास करण्यात येणार आहे. प्रवाशांची संख्या, प्रवासाची मागणी, उपलब्ध सेवा, मार्गाचे अंतर, प्रवासाचा कालावधी आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा विचार करून स्पर्धात्मक मार्गांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर नव्या व्होल्व्हो आणि शयनयान बससाठी मार्ग निश्चित करण्यात येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.