डीसीपींकडून धमकी, असभ्य वर्तन
कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळातील प्रकार; खासदार राऊत यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : कुलाबा येथील ‘बालगोपाल मित्र सार्वजनिक उत्सव मंडळा’च्या पदाधिकाऱ्यांना आणि महिलांना दक्षिण विभागाचे वाहतूक पोलिस उपायुक्त (डीसीपी) हेमराज राजपूत यांनी धमकी, शिवीगाळ आणि असभ्य वर्तन केल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
खासदार राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे की, शुक्रवारी त्यांनी ३, पास्ता लेन, कुलाबा येथील बालगोपाल मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली असता, कार्यकर्त्यांनी आणि गणेशभक्तांनी ही गंभीर तक्रार त्यांच्याकडे केली. गणेशोत्सवासाठी महापालिकेचा वैध परवाना आणि अनेक वर्षांपासून हा उत्सव त्याच जागेवर होत असताना, डीसीपी राजपूत यांनी तेथे जाऊन दहशत निर्माण केली. त्यांनी उपस्थित महिलांशी असभ्य व अरेरावीचे वर्तन करत त्यांचे मोबाईल खेचून घेतल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण झाल्याचे पत्रात म्हटले आहे.
मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न पांडे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीत मकरंद नार्वेकर यांना पाठिंबा दिला नाही, याच रागातून डीसीपी राजपूत यांनी हे बेकायदा वर्तन केले असल्याचा दावा संजय राऊत यांनी पत्रात केला आहे. यामागे कोणते राजकारण आणि राजकीय व्यक्ती आहे, असा सवाल उपस्थित करत याची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.