गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांना तंत्रज्ञानाची साथ
मज्जातंतूंच्या कार्यावर सातत्याने देखरेख ठेवणारी ‘आयओएनएम’ प्रणाली उपलब्ध होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये होणाऱ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी अत्याधुनिक ‘इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग’ (आयओएनएम) प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया सुरू असताना रुग्णाच्या महत्त्वाच्या मज्जातंतूंच्या कार्यावर सातत्याने लक्ष ठेवण्याचे काम या तंत्रज्ञानाद्वारे केले जाते. त्यामुळे मज्जातंतूंना इजा होण्याचा धोका वेळीच ओळखून शल्यचिकित्सकांना आवश्यक खबरदारी घेणे शक्य होणार आहे.
आयओएनएम प्रणाली शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंमधून निर्माण होणाऱ्या विद्युत संकेतांचे सतत निरीक्षण करते. संबंधित मज्जातंतूच्या कार्यामध्ये बदल आढळल्यास यंत्रणेद्वारे शल्यचिकित्सकांना तत्काळ सूचना मिळते. त्यानुसार शस्त्रक्रियेची पद्धत किंवा पुढील प्रक्रिया आवश्यकतेनुसार बदलता येते.
थायरॉईडच्या शस्त्रक्रियेत स्वरयंत्राशी संबंधित मज्जातंतूंना इजा झाल्यास आवाजात बदल होण्याची शक्यता असते, तर मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रियांमध्ये मज्जातंतूंना झालेली इजा रुग्णाच्या हालचाली किंवा इतर शारीरिक कार्यांवर परिणाम करू शकते. त्यामुळे अशा शस्त्रक्रियांमध्ये मज्जातंतूंच्या कार्यावर देखरेख ठेवणारे हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.
महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यास अत्याधुनिक शस्त्रक्रिया अधिक सुरक्षितपणे करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांनाही आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार आहे. या प्रणालीच्या खरेदीसाठी मुंबई महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने कार्यवाही करण्यात येत आहे.
इजा होण्याची शक्यता
महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने शस्त्रक्रिया केल्या जातात. विशेषतः मेंदू, मणका, थायरॉईड तसेच कान-नाक-घसा आणि न्यूरोसर्जरीशी संबंधित काही शस्त्रक्रियांमध्ये महत्त्वाच्या मज्जातंतूंच्या अगदी जवळ शस्त्रक्रिया करावी लागते. अशा वेळी मज्जातंतूंवर ताण येणे किंवा त्यांना इजा होण्याची शक्यता असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.