गणेशोत्सवातून ज्ञानदानाचा जागर
‘एक वही, एक पेन’ उपक्रमाचे नववे वर्ष; शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समता आणि परिवर्तन घडवून आणणाऱ्या ज्ञानज्योती महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्यासाठी शिवशक्ती सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रणीत गोविंद भाऊ सहाय्यता कक्षाच्या वतीने यंदाही ‘एक वही, एक पेन’ हा सामाजिक-शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे हे नववे वर्ष असून, महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशतकी जयंती वर्षानिमित्त यंदाचा उपक्रम विशेष स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या उपक्रमांतर्गत वही, पेन, पेन्सिल, स्कूल बॅग यांसह विविध शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन गणेशभक्त आणि नागरिकांना करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
१४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव मंडपात संकलित होणारे शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष साहित्य देणे शक्य नसलेल्या नागरिकांसाठी मंडळाच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महात्मा फुले यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानून, वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेत ‘ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान’ या भावनेतून हा उपक्रम राबविला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्याला सामाजिक जाणीव, शैक्षणिक मदत आणि समाजोपयोगी उपक्रमांची जोड मिळावी, या उद्देशाने ‘एक वही, एक पेन’ उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवशक्ती सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गोविंद भाऊ सहाय्यता कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रत्येक घटकाला शिक्षणाची संधी
‘शिक्षणातून समता, ज्ञानातून परिवर्तन’ हा संदेश घेऊन सुरू असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सवात जमा होणारे शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष दिलीप मुळीक यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा आणि समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.