गणेश मंडळांनो, वीज सुरक्षेत तडजोड नको!
समन्वय समितीचे आवाहन; पावसाळ्यात अधिक दक्षतेच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : काळाचौकी परिसरात विजेचा धक्का लागून दोन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू ,जोगेश्वरीत एकाचा मृत्यू आणि काही भाविक जखमी झाल्याच्या दुर्घटनांनी संपूर्ण गणेशोत्सव विश्वावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर गणेश दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना विद्युत सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे अत्यंत कळकळीचे आवाहन केले आहे.
सजावट आणि रोषणाईपेक्षा भाविकांचा जीव अधिक मौल्यवान आहे, असे स्पष्ट करीत अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी बेस्ट प्रशासनाने दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे तातडीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
बेस्ट प्रशासन व समन्वय समितीने मुख्य मार्गदर्शक सूचना पुन्हा जाहीर केल्या असून, संपूर्ण विद्युत यंत्रणेचा भार मंजूर भाराच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावा. मुख्य तारा, स्विचेस, एमसीबी व इएलसीबी यांची क्षमता स्वीकृत भाराच्या प्रमाणातच असावी. प्रत्येक विद्युत उपकरणासाठी योग्य व स्वतंत्र अर्थिंग व्यवस्था असणे अनिवार्य आहे. सर्व जोडण्यांसाठी ईएलसीबी बसवून त्याची कार्यक्षमता तपासून घ्यावी. सर्व मुख्य तारा पीव्हीसी इन्स्टॉलेशन असलेल्या असाव्यात आणि त्या पीव्हीसी कंड्युट्समधून सुरक्षितपणे नेण्यात याव्यात. मुख्य तारांमध्ये जोड देऊ नयेत. अपरिहार्य असल्यास योग्य कनेक्टर आणि जंक्शन बॉक्सचाच वापर करावा. मुख्य वीजवाहिन्या परिसराच्या बाहेरून नेण्यासाठी आर्मड केबल्सचाच वापर करावा. विद्युत जोडणीचा इन्सुलेशन रेसिस्टन्स योग्य आयआर टेस्टरद्वारे तपासावा. संपूर्ण यंत्रणेची तपासणी परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून करून घेऊन त्याचा अहवाल तयार ठेवावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणी तात्पुरत्या जोडण्या, उघड्या तारा किंवा स्टॉल्स राहणार नाहीत याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
सुरक्षिततेमध्ये खरी जबाबदारी
एखादी छोटीशी विद्युत चूक निष्पाप भाविकाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे नंतर पाहू, अशी निष्काळजी भूमिका न घेता आताच तपासू आणि सुरक्षित करू, हा दृष्टिकोन प्रत्येक मंडळाने स्वीकारावा. भक्तीमध्ये शक्ती आहे, पण सुरक्षिततेमध्ये खरी जबाबदारी आहे, असे आवाहन ॲड. नरेश दहिबावकर, प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.