निर्माल्यातून खतनिर्मितीचा प्रयोग यशस्वी
मुंबई महापालिकेकडून दररोज संकलन
मुंबई, ता. २१ : मुंबईतील गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे निर्माल्य समुद्रात किंवा नदीनल्यांमध्ये जाऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने निर्माल्याचे दररोज संकलन करून त्यापासून सेंद्रिय खत बनवण्यास सुरुवात केली आहे. पालिकेचा हा प्रयोग आता यशस्वी होऊ लागला आहे.
मुंबई १० हजारांहून अधिक सार्वजनिक आणि सव्वा लाखाहून अधिक घरगुती गणपतीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. पूजेसाठी फुले, हार, पाने, दुर्वा, नारळाचे तुकडे असे साहित्य मोठ्या प्रमाणावर निर्माल्याच्या स्वरूपात जमा होते. मुंबई महापालिकेने गणेशोत्सवातील निर्माल्यापासून खतनिर्मिती, निर्माल्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यास २००३ पासून सुरुवात केली होती. त्या वेळी निर्माल्यापासून खत तयार करून ते पालिकेच्या उद्यानांसाठी वापरण्याची व्यवस्था होती.
२०१६ मध्ये गणेशोत्सवानंतर जमा झालेल्या सुमारे १,०८३ मेट्रिक टन फुलांच्या निर्माल्यापासून २१ ठिकाणी तात्पुरत्या कंपोस्टिंग प्रकल्पांत प्रक्रिया करण्यात आली. २०१७ मध्ये १६ कंपोस्टिंग खड्ड्यांमध्ये निर्माल्याची प्रक्रिया करून खत तयार करण्यात आले. तर २०२४मध्ये सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्य संकलित करून ते २४ विभागांतील ३७ सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये पाठवण्यात आले. यंदा पालिकेने विविध विभागांत गणेशोत्सवातील निर्माल्यापासून खतनिर्मितीसाठी निविदा मागवल्या आहेत.
निर्माल्यापासून तयार झालेले खत महापालिकेच्या उद्यानांमध्ये किंवा स्थानिक पातळीवर वापरले जाते. काही स्वयंसेवी संस्थांकडून फुलांच्या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याची पावडर तयार केली जाते आणि त्यापासून अगरबत्ती तयार करण्याचे प्रयोग करण्यात येत असल्याची माहिती पालिकेने दिली.
गतवर्षी ५०८ मेट्रिक टन निर्माल्य जमा
गेल्यावर्षी गणेशोत्सवात मुंबईत ५०८ मेट्रिक टन निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जनस्थळांवर ठेवलेल्या ५९४ निर्माल्य कलशांद्वारे आणि ३०७ निर्माल्य संकलन वाहनांद्वारे गोळा करण्यात आले. फुले, हार आणि इतर पूजासाहित्य पाण्यात टाकण्याऐवजी निर्माल्य कलशांमध्ये जमा केले जाते. ओला आणि इतर कचरा वेगळा केला जातो. निर्माल्यातील प्लॅस्टिक, सिंथेटिक दोरे, कापड किंवा इतर अजैविक वस्तू वेगळ्या करण्याचा प्रयत्न केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.