सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : महापालिकेतील कामगार, कर्मचारी, परिचारिका, तंत्रज्ञ आणि अभियंत्यांवर अन्याय करणारी ‘नवीन राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ लादल्यास महापालिकेत तीव्र संघर्ष अटळ असेल, असा थेट इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने दिला आहे. लोकप्रतिनिधींना ५ वर्षे सेवेनंतर आजीवन पेन्शन मिळते, मग रात्रंदिवस सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने का पुसली जात आहेत, असा सवाल करत, आमदारांनी आधी स्वतःची पेन्शन बंद करून दाखवावी, अशी जळजळीत प्रतिक्रिया युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीने एमपीएसबाबतचा ठराव मंजूर केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. २०१०-११ ते २०२४-२५ या कालावधीत जमा झालेली तब्बल ६,२३९.०८ कोटी रुपयांची रक्कम ‘पीएफआरडीए’कडे वर्ग केली जाणार आहे. ‘ही इतकी मोठी रक्कम नक्की कुठे गुंतवली जाणार, याची कोणतीही स्पष्ट कल्पना कामगारांना किंवा मान्यताप्राप्त संघटनांना दिलेली नाही. उद्या जर शेअर बाजारात घसरण होऊन ही रक्कम बुडाली, तर कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशांचे काय होणार,’ असा प्रश्न अशोक जाधव यांनी उपस्थित केला आहे.
युनियनच्या नेत्यांनी यापूर्वीच महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांची भेट घेऊन ही योजना कामगारविरोधी कशी आहे, हे पटवून दिले होते, मात्र गणेशोत्सवाच्या काळात कामगार नेते गावी गेल्याची संधी साधून, कोणतीही चर्चा न करता हा एकतर्फी ठराव मंजूर करण्यात आला, असा आरोप युनियनने केला आहे.
आजीवन पेन्शन बंदचा ठराव मंजूर करावा
इतर राज्यांप्रमाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना २००८ पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा कामगारविरोधी एनपीएस चा ठराव महापालिकेच्या मुख्य सभागृहात फेटाळून लावावा, जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवक, आमदार आणि खासदारांच्या निवासस्थानी जाऊन थेट निवेदने दिली जातील, कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारली जात असेल, तर लोकप्रतिनिधींनीही स्वतःची आजीवन पेन्शन बंद करण्याचा ठराव आधी मंजूर करावा, अशा काही मागण्या केल्या आहेत.
...अन्यथा आंदोलन
गणेशोत्सवानंतर या मुद्द्यावर महापालिका कर्मचाऱ्यांचा असंतोष अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, म्युनिसिपल मजदूर युनियनने याविरोधात मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती सरचिटणीस वामन कविस्कर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.