पालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांना वेग
बदल्या रोखण्यासाठी युनियनची धावाधाव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : महापालिकेतील अभियंत्यांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेला सुरुवात झाली असतानाच वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या एक हजार ६९५ अभियंत्यांच्या बदल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने पारदर्शक पद्धतीने बदली करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू केली असली, तरी पाणी खात्यासह काही विभागांतील मोठ्या संख्येने अभियंत्यांच्या बदल्या रोखण्यासाठी युनियनकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाची बदली प्रक्रिया प्रशासनासाठी कसोटीची ठरणार आहे.
महापालिकेने अभियंत्यांच्या बदल्यांच्या पहिल्या टप्प्यात २० सप्टेंबरपर्यंत ८३६ अभियंत्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात कार्यरत असलेल्या तब्बल एक हजार ६९५ अभियंत्यांची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे. यामध्ये ४८५ कनिष्ठ अभियंते, १४० सहाय्यक अभियंते आणि तब्बल एक हजार ७० उपअभियंत्यांचा समावेश आहे. या बदली प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्यांना एक ते पाच पसंतीची ठिकाणे निवडण्याची संधी देण्यात आली आहे. उपलब्ध रिक्त पदे, कर्मचाऱ्यांची पसंती, संबंधित विभागाची गरज आणि मनुष्यबळाचे नियोजन यांचा संगणकीय पद्धतीने ताळमेळ साधून नियुक्ती करण्याची प्रशासनाची योजना आहे. ‘रँडमायझेशन’च्या माध्यमातून बदलीचे निर्णय घेतले जाणार असल्याने मानवी हस्तक्षेपाला आळा घालण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी तीन उपायुक्तांची समितीही गठित करण्यात आली आहे.
प्रशासनावर दबाव!
पहिल्या टप्प्यातील बदली प्रक्रिया २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यापूर्वी ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान संगणकीय सोडत काढली जाणार आहे, मात्र पाणी खात्यातील एकाच वेळी १०० ते २०० अभियंत्यांच्या बदल्या रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. बदली प्रक्रिया थांबविण्यासाठी युनियनकडून प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचेही समजते, मात्र प्रशासन बदली प्रक्रियेवर ठाम असल्याचे सांगण्यात येते.
२५ टक्के अभियंत्यांच्या बदल्या
नियमानुसार पात्र अभियंत्यांपैकी सुमारे २५ टक्के अभियंत्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. विशेषतः १५ वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अभियंत्यांना प्राधान्याने हलविण्याचे नियोजन आहे. केवळ अभियंत्यांच्या पसंतीनुसार नव्हे, तर महापालिकेच्या विभागीय गरजा आणि रिक्त पदांचा विचार करून बदल्या करण्यात येणार आहेत.
८३६ अभियंत्यांचे बदलीसाठी अर्ज
सहाय्यक अभियंता पदासाठी ७९ अर्ज आले असून, त्यापैकी ४२ सिव्हिल आणि ३७ यांत्रिकी व विद्युत विभागातील आहेत. कनिष्ठ अभियंता पदासाठी ३२९ अर्ज आले असून, त्यात २५६ सिव्हिल आणि ७३ यांत्रिकी व विद्युत विभागातील अर्ज आहेत. उपअभियंता पदासाठी सर्वाधिक ४२८ अर्ज आले आहेत. त्यात ३०७ सिव्हिल आणि १२१ यांत्रिकी व विद्युत विभागातील अभियंत्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण ८३६ अभियंत्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.