मुंबई

बेकायदा फलकांपासून विद्यार्थ्यांना दप्तरे, चटई

CD

बेकायदा फलकांपासून विद्यार्थ्यांना दप्तरे, चटई
पालिकेचा ग्रीन सोल फाउंडेशनासोबत पुनर्वापरासाठी करार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईत वर्षभर साजरी होणारी सण-उत्सवांची मालिका आणि राजकीय नेत्यांच्या वाढदिवसांचे पेव फुटल्याने चौकाचौकांत लागणारे बेकायदा फ्लेक्स-बॅनर ही महापालिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरत होते. या फलकांवर कारवाई करताना पालिकेचा वेळ, पैसा आणि मनुष्यबळ प्रचंड प्रमाणावर वाया जात होते. त्यातच जप्त केलेले हे फलक साठवायचे कुठे, असा भीषण प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला होता, मात्र आता पालिकेने या कचऱ्यावर एक अद्भुत आणि पर्यावरणपूरक तोडगा शोधून काढला आहे. या जप्त केलेल्या फलकांचा पुनर्वापर करून त्यापासून थेट पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी दप्तरे आणि चटई बनवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

गणेशोत्सवादरम्यान शहरात लाखोंच्या संख्येने बेकायदा बॅनर लावले गेले होते. पालिकेने या फलकांवर धडक कारवाई करत आतापर्यंत काही मेट्रिक टन साहित्य जमा केले आहे. हे सर्व फलक सध्या परळ येथील पुलाखालील जागेत ठेवण्यात आले आहेत. या फलकाच्या कचऱ्यावर मार्ग काढण्यासाठी महापालिकेने ‘ग्रीन सोल फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेशी हातमिळवणी केली आहे. या संस्थेचा रिसायकलिंग प्रकल्प भिवंडी येथे आहे. विशेष म्हणजे, या करारामुळे आता पालिका कर्मचाऱ्यांचा बॅनर काढण्याचा ताण पूर्णपणे हलका होणार आहे. ही संस्था स्वतःच्या खर्चाने मुंबईभरातील बेकायदा बॅनर काढणार, ते भिवंडीला वाहून नेणार आणि त्यावर प्रक्रिया करणार आहे. यामुळे पालिकेचे लाखो रुपये आणि मनुष्यबळ वाचणार आहे. यापूर्वी याच संस्थेने रिसायकल केलेल्या साहित्यातून उत्तम दर्जाच्या चपलांची निर्मिती केली होती. आता याच धर्तीवर जप्त केलेल्या फलकांपासून टिकाऊ बॅग (दप्तरे) आणि चटई तयार करण्यात येणार आहेत. ही उत्पादने महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटली जाणार आहेत.
​
‘बेकायदा फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण तर होतेच, पण कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होते. हे तर पर्यावरणासाठीही धोकादायक आहेत. या निर्णयामुळे महापालिकेचा वेळ आणि पैसा वाचणार असून, पर्यावरणाचे रक्षण होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरजू पालिकेच्या विद्यार्थ्यांना यातून थेट मदत मिळेल.
- वृषाली इंगुले, सहाय्यक आयुक्त, एफ, दक्षिण विभाग

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT