दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना पाेषण आहार
मुख्यमंत्र्यांचे व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश
मुंबई, ता. ५ : शालेय पाेषण आहाराचा लाभ सध्या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. हा लाभ दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना देण्याचे सूताेवाच साेमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याबाबत व्यवहार्यता तपासून त्याचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाला दिले. विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार वेळेत मिळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा स्तरावर द्यावेत. यासाठी दाेन्ही विभागांनी संयुक्त धोरण आखून मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची आढावा बैठक झाली. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते. सर्व महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आहाराचा दर्जा राखण्यासाठी शहरी भागाबरोबरच ज्या ग्रामीण भागांत केंद्रीय स्वयंपाकगृहाचा पर्याय व्यवहार्य ठरेल अशा ठिकाणी तो पर्याय स्वीकारावा. दुर्गम आणि आदिवासी भागांतील शाळांपर्यंत केंद्रीय स्वयंपाकगृहातून अन्न पोहोचण्यास उशीर लागत असल्याने तेथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इतर पर्याय स्वीकारावेत. शक्य तेथे आहार वितरणाची जबाबदारी स्थानिक बचतगटांना द्यावी. संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी स्थानिक गरजा व व्यवहार्यता लक्षात घेऊन याबाबत निर्णय घ्यावा, असे आदेश दिले.
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय स्वयंपाकगृहाची व्याप्ती वाढवावी तसेच ग्रामपंचायतींना निधी देऊन स्थानिक पातळीवर पोषण आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी द्यावी, अशी सूचना केली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विभागाच्या माध्यमातून शहरी भागात ३० अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरविण्याचे काम ‘इस्कॉन’कडे देण्यात येत असल्याचे सांगितले.
शालेय शिक्षण विभागामार्फत राज्य व केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित ८५ हजार २०६ पात्र शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देण्यात येतो. आहारात विविधता आणण्यासाठी विविध प्रकारचे पुलाव, खिचडी, उसळ, वरण-भात यांसह १२ प्रकारच्या पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
----
‘पार्टिसिपेट मुंबई’ प्रकल्पाचे आज उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : महापालिका आणि ‘समग्र’ संस्था यांच्यातील सर्वसमावेशक करारासह ‘पार्टिसिपेट मुंबई’ या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (ता. ६) पार पडणार आहे. महापालिका मुख्यालयातील सभागृहात सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष व स्थानिक आमदार ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, आमदार अमित साटम, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व मनपातील गटनेते उपस्थित राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.