देशभरातील हवामानात मोठे बदल होत असतानाच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अक्वान चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. या चक्रीवादळाच्या मार्गात बदल झाल्याने पूर्व किनारपट्टीवरील राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागाला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. भारत हवामान विभागाच्या अंदाजानुसार, चक्रीवादळाचा परिणाम ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगडसह काही राज्यांमध्ये जाणवू शकतो. या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार वाऱ्याचा वेग ताशी १२० ते १३० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, २० नोव्हेंबरच्या पहाटेच्या ताज्या माहितीनुसार चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर, तर झोतांचा वेग ९० किलोमीटरपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.