मुंबई, ता. ६ : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी चार वर्षांचा पूर्णवेळ पदवी औषधनिर्माणशास्त्र- बी. फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या व सहा वर्षांच्या पूर्णवेळ पदवी फार्म.डी. या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या जागावाटपाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या दुसऱ्या यादीसाठी १७ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी पसंती दाखविली होती त्यापैकी १४ हजार २७० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये सहा हजार ९०७ विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे, तर पहिल्या यादीतील १६ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी फार्मसी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.
पहिल्या यादीत राज्यातील ५२८ फार्मसी महाविद्यालयातील ४६ हजार ९८४ जागांपैकी २८ हजार १३९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यामधून १६ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी फार्मसी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.
दुसऱ्या यादीसाठी विद्यार्थांना दिलेल्या मुदतीत १७ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार दुसऱ्या यादीसाठी करण्यात आला. या विद्यार्थ्यांपैकी १४ हजार २७० विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये प्रथमच सहा हजार ४४२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी प्राप्त झाली आहे.
सहा हजार विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय
दुसऱ्या यादीत सहा हजार ९०७ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार पहिल्या तीनपैकी एका पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. यांचे हे प्रवेश ऑटो फ्रीज झाले आहेत. या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. या विद्यार्थ्यांनी जर काही कारणाने हा प्रवेश नाकारला, तर या विद्यार्थ्यांना तिसऱ्या व चौथ्या फेरीत उतरता येणार नाही. त्यांना थेट त्यानंतरच्या खुल्या फेरीत म्हणजे संस्थात्मक फेरीत उतरावे लागेल.
१० ऑक्टोबरला तिसऱ्या फेरी
विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी आता ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यानंतर १० ऑक्टोबरला तिसऱ्या फेरीसाठी तात्पुरत्या रिक्त जागा जाहीर करण्यात येतील.