भातात जिवंत कीटक; काळवंडलेल्या तेलाचा वापर
मुंबईतील ११ हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्सवर एफडीएची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : शिजवलेल्या भातात जिवंत कीटक, चिकन शेजवान राईसमध्ये कीटक, काळवंडलेले तेल, गंजलेली भांडी-साचे, अन्नाची अयोग्य साठवणूक आणि अस्वच्छता अशा गंभीर त्रुटी मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स आणि बेकरी आस्थापनांमध्ये आढळून आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबई विभागातील ११ आस्थापनांवर कारवाई केली असून, आठ आस्थापनांचे परवाने आणि तीन आस्थापनांची नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित केली आहेत.
गिरगावातील भारत कॉफी हाउसमध्ये उघड्या शिजवलेल्या भातात जिवंत कीटक आढळले. अस्वच्छ कचराकुंडीत कच्च्या मांसाचे अवशेष होते. मॅरिनेट केलेले मांस ठेवण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केला जात असल्याचेही आढळले. कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, गंजलेली व तुटलेली भांडी वापरणे आणि कीटक नियंत्रणाच्या नोंदी नसल्याचेही समोर आले. ताडदेव लंच होममध्ये चिकन शेजवान राईसमध्ये कीटक आढळल्याच्या तक्रारीनंतर तपासणी करण्यात आली. माझगाव येथील रोशन बेकरीमध्ये गंजलेले बेकिंग ट्रे व अॅल्युमिनियमचे साचे, उघडे अन्नपदार्थ, बिगर-अन्न दर्जाचे पॅकेजिंग आणि काळवंडलेले तेल पुन्हा वापरले जात असल्याचे आढळले. मिस्टर मोमो किंगमध्ये अन्नपदार्थ कचऱ्याजवळ आणि अस्वच्छ ठिकाणी ठेवले होते. काळवंडलेले तेल आणि बिगर-अन्न दर्जाचे प्लॅस्टिक वापरल्याचेही निदर्शनास आले.
विलेपार्लेतील आर. एन. कूपर महापालिका रुग्णालयाच्या स्टाफ कँटीनमधील सत्कार केटरर्सच्या तपासणीत माशा व झुरळांचा वावर आढळला. बोरिवलीतील नोम नोम रेस्टॉरंट्समध्ये अन्न साठवणूक व शीतकरणाचे तापमान योग्य नसल्याचे, तर मुम्माज किचनमध्ये अन्न व पाणी तपासणी, कीटक नियंत्रण आणि लेखापरीक्षणाच्या नोंदी नसल्याचे आढळले. छोटूज किचनमध्येही तापमान, स्वच्छता आणि कीटक नियंत्रणाबाबत त्रुटी आढळल्या. अंधेरीतील सुरज लामा मोमोज येथे अन्नसाठा आणि स्वच्छता रसायने एकत्र ठेवण्यात आल्याचे तसेच आवश्यक आरोग्य व प्रशिक्षण नोंदी नसल्याचे आढळले.
तीन जणांना अटक
मुंबई विभागात प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातही कारवाई करण्यात आली. तीन आस्थापनांवरून ३१ लाख १४ हजार ६१५ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करून तीन एफआयआर दाखल करण्यात आले. तीन जणांना अटक करण्यात आली. नवी मुंबईतील एपीएमसी तुर्भे फळ बाजारात इथेफॉनच्या द्रावणात बुडवून कृत्रिमरीत्या पिकविलेली १,३९४ किलो केळी, ६७ हजार ८१४ रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.