कॅडिलाच्या तीन गोदामांचे परवाने रद्द
चिन्हामुळे ब्रँडच्या ओळखीबाबत संशय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : ब्रँड आणि चिन्हाचा बदल करून वेगळा औषधी घटक असलेले उत्पादन बाजारात आणल्यास रुग्ण, डॉक्टर आणि औषधविक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करत अन्न व औषध प्रशासनाने अहमदाबाद येथील मे. कॅडिला फार्मास्युटिकल्स लि. कंपनीविरोधात कठोर कारवाई केली आहे. कंपनीच्या पुणे, नागपूर आणि ठाणे-भिवंडी येथील सीएफए गोदामांचे औषध विक्री व वितरण परवाने रद्द करण्यात आले आहेत.
एफडीएच्या तपासणीत ‘ॲसिलॉक १५०/३००’ या ब्रँडमध्ये रॅनिटिडिन, तर ‘ॲसिलॉक १५०+/३००+’ या ब्रँडमध्ये फॅमोटिडिन हा वेगळा औषधी घटक असल्याचे आढळले. मूळ औषधी घटक बदलला असतानाही ब्रँड नावात केवळ चिन्हाचा वापर करण्यात आल्याने दोन्ही औषधांमध्ये साम्य निर्माण झाले. त्यामुळे औषधाची नेमकी ओळख आणि त्यातील घटक याबाबत संभ्रम होण्याची शक्यता एफडीएने नोंदवली. कॅडिलाच्या फॅमोटिडिन उत्पादनाचे परवाने यापूर्वीच रद्द करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित उत्पादनाच्या विक्री-वितरण साखळीवरही कारवाई करण्यात आली. हा निर्णय २ जूनपासून लागू असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान औषधांवर ‘नॉट फॉर सेल’ असा स्पष्ट फलक नसणे, तसेच सक्षम व्यक्ती अनुपस्थित असताना स्वाक्षरीशिवाय बिले तयार करणे यांसह अन्य त्रुटीही आढळून आल्या. त्यामुळे केवळ उत्पादनाच्या नावाबाबतच नव्हे, तर औषधांच्या साठवणूक व विक्री-वितरण प्रक्रियेबाबतही प्रशासनाने आक्षेप नोंदवला. औषधाच्या ब्रँड नावामुळे रुग्ण, डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये, ही भूमिका ‘एफडीए’ने या कारवाईत स्पष्ट केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.