जेएनपीएतील वाहतूक पूर्वपदावर
उपाययोजनांनंतर ट्रकचा सरासरी फेरा १.४७ तासांवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : जवाहरलाल नेहरू बंदरातील (जेएनपीए) वाहतूक गेल्या आठवड्यातील कोंडीनंतर आता पूर्वपदावर आली आहे. निर्यात मालाची अचानक वाढलेली आवक आणि एकाच वेळी १५ हून अधिक कंटेनर जहाजे दाखल झाल्याने टर्मिनलच्या प्रवेशद्वारांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, मात्र बंदर प्रशासन, टर्मिनल ऑपरेटर, कंटेनर फ्रेट स्टेशन्स (सीएफएस) आणि स्थानिक वाहतूक यंत्रणेच्या समन्वयातून केलेल्या उपाययोजनांमुळे रविवारपासून वाहतूक सुरळीत झाली आहे.
निर्यात-आयात मालाच्या वाढत्या मागणीमुळे ४ ऑक्टोबरला बंदरातील जहाजांवरून तब्बल ३५ हजार ३०७ टीईयू कंटेनरची हाताळणी झाली. ५ ऑक्टोबरला ३२ हजार ९७२ टीईयू कंटेनर हाताळण्यात आले. या काळात विविध टर्मिनलवर १६ ते १७ कंटेनर जहाजे एकाच वेळी उभी होती.
१८ हजारांहून अधिक ट्रकची ये-जा
२ ऑक्टोबरला टर्मिनलच्या प्रवेशद्वारांवर २१ हजार ७९६ टीईयू मालाची वाहतूक झाली. त्यासाठी १८ हजार ३९१ ट्रकची ये-जा झाली. ३ ऑक्टोबरला २० हजार ६८४ टीईयू मालाची वाहतूक झाली असून, १७ हजार ५३५ ट्रकची नोंद झाली. अतिरिक्त व्यवस्था आणि स्वयंचलित गेट प्रणालीच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. ५ ऑक्टोबरला १६ हजार ९७२ टीईयू मालाची वाहतूक १५ हजार ४५ ट्रकच्या माध्यमातून झाली. त्यामुळे बंदरातील ट्रकचा सरासरी फेरा १.४७ तासांवर आला.
यार्डमधील कंटेनरचा भार घटला
२ ऑक्टोबरला बंदरातील यार्डमध्ये एक लाख २० हजार १७३ टीईयू कंटेनर होते. यार्डची व्यापलेली क्षमता ६६.८९ टक्क्यांवर पोहोचली होती. ६ ऑक्टोबरपर्यंत कंटेनरची संख्या ९४ हजार ५१९ टीईयूवर आली असून, व्यापलेली क्षमता ५२.६१ टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे सर्व टर्मिनलवर कंटेनर साठविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे.
सीएफएसमधील प्रलंबित मालात घट
आयात मालाची जलद उचल करण्यासाठी टर्मिनल आणि सीएफएस ऑपरेटरांमध्ये समन्वय वाढविण्यात आला. त्यामुळे ४ ऑक्टोबरला २२ हजार ६२२ टीईयू असलेला प्रलंबित आयात माल ६ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत १५ हजार ७७० टीईयूवर आला. परिणामी बंदराकडे येणाऱ्या मार्गांवरील कोंडी दूर झाली असून, मालवाहतूक सुरळीत सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.