मुंबई, ता. ७ : महाराष्ट्रात व्यवसाय करताना प्रवाशांशी दैनंदिन व्यवहारासाठी मराठीत संवाद साधता यावा, यासाठी अमराठी रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित प्रवासी वाहनचालकांनी मराठी शिकावे, असे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. व्यावहारिक मराठीसंदर्भातील सुधारित नियमांच्या अंमलबजावणीला १८ ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगिती असली तरी या कालावधीचा उपयोग मराठी शिकण्यासाठी करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘महाराष्ट्र माझा...मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या पुढील टप्प्याच्या नियोजनासाठी सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. परिवहन, मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १८० हून अधिक ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली. सुमारे १,८०० शिक्षकांच्या माध्यमातून एक लाख ६५ हजार ८०० हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
मात्र, अद्याप मोठ्या संख्येने चालक प्रशिक्षणापासून दूर आहेत. त्यामुळे अभियानाचा दुसरा टप्पा व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रशिक्षण केंद्रांबरोबरच ऑनलाइन माध्यमातूनही मराठी शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यात सुमारे ९ लाख ७८ हजार रिक्षा व टॅक्सीचालक कार्यरत आहेत. त्यात सुमारे नऊ लाख १६ हजार रिक्षाचालक आणि ६१ हजार टॅक्सीचालकांचा समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेशात चार लाख ४० हजार २३८ रिक्षाचालक आणि ४३ हजार १०६ टॅक्सीचालक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.