मुंबईकरांना मलेरिया, स्वाइन फ्ल्यूचा ताप
चार महिन्यांत मलेरियाचे ७,४२२; स्वाइन फ्ल्यूचे ५०४ रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : पावसाळ्यातील आजारांनी मुंबईकरांची चिंता वाढवली असून, जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांत मलेरिया आणि स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. दुसरीकडे डेंगी, लेप्टोस्पायरोसिस, चिकुनगुनिया, गॅस्ट्रो आणि कोविड-१९च्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. बदलते हवामान, तापमानातील चढ-उतार आणि वाढती आर्द्रता यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घसादुखीच्या तक्रारीही वाढत आहेत.
महापालिकेच्या तुलनात्मक आकडेवारीनुसार, यंदा चार महिन्यांत मलेरियाचे सात हजार ४२२ रुग्ण आढळले. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या पाच हजार १४४ होती. स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या ७१ रुग्णांच्या तुलनेत यंदा ५०४ रुग्ण नोंदवण्यात आले.
डेंगी, लेप्टो आणि गॅस्ट्रोमध्ये घट
यंदा डेंगीचे दोन हजार ९४१ रुग्ण आढळले असून, गेल्या वर्षी ही संख्या तीन हजार ३५६ होती. लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण ५४९ वरून २८६, गॅस्ट्रोचे दोन हजार ६३९ वरून दोन हजार १९४, चिकुनगुनियाचे ५०९ वरून ६६, तर कोविड-१९चे रुग्ण ६७८ वरून १६५ इतके कमी झाले आहेत.
११ लाखांहून अधिक घरांचे सर्वेक्षण
आजारांचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने सप्टेंबरमध्ये व्यापक आरोग्य मोहीम राबवली. ११ लाख २२ हजार ४३३ घरांचे सर्वेक्षण करून ५२ लाख ५१ हजार ५९८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ६३ हजार ८३७ रक्तनमुने घेण्यात आले, तर ३४२ आरोग्य शिबिरे घेण्यात आली.
मलेरिया नियंत्रणासाठी ३८ हजार २८ डासांच्या उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सहा हजार ३१० ठिकाणी मलेरिया पसरविणाऱ्या ॲनोफिलीस डासांची उत्पत्ती आढळली. डेंगीच्या नियंत्रणासाठी १० लाख ४४ हजार ५५५ उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यात आली असून, २३ हजार ४०५ ठिकाणी एडीस डासांची उत्पत्ती आढळली.
काही भागांत आजारांचे प्रमाण अधिक
अंधेरी पूर्व-पश्चिम, वांद्रे पश्चिम, कांदिवली, मालाड आणि विक्रोळी-पवई परिसरात स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण अधिक आढळले आहेत. सांताक्रूझ पूर्व, दहिसर, अंधेरी, चेंबूर आणि माटुंगा-शीव भागात लेप्टोस्पायरोसिसचे प्रमाण वाढले आहे. खार, वांद्रे, गोवंडी, साकीनाका आणि मालाड परिसरात गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले आहेत.
बदलत्या हवामानाचा परिणाम
मुंबईतील तापमानातील चढ-उतार, वाढती आर्द्रता आणि बदलते वातावरण यामुळे सर्दी, खोकला, ताप, घसादुखी आणि अंगदुखीच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच श्वसनविषयक त्रास असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला जे. जे. रुग्णालयाचे छाती विकार तज्ज्ञ डॉ. रोहित हेगडे यांनी दिला आहे.
बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या तक्रारी वाढू शकतात, मात्र प्रत्येक ताप किंवा खोकला हा गंभीर संसर्गाचे लक्षण असेलच असे नाही. नागरिकांनी स्वतःहून अँटिबायोटिक्स किंवा इतर औषधे घेणे टाळावे. विलंब न करता वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
– डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, सर जे. जे. रुग्णालय
५२, ५१, ५९८ नागरिकांचे सर्वेक्षण
– रक्ताचे नमुने तपासणीसाठी : ६३ हजार ८३७
– मलेरियाचे रुग्ण : ६,४२२
– डेंगीचे रुग्ण : २,१४९
– लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण : २८६
– चिकुनगुनियाचे रुग्ण : ६६
– एच१एन१चे रुग्ण : ४०८
– गॅस्ट्रोचे रुग्ण: २,९९४
– एडिस डासांची उत्पत्तीस्थाने : २३,४०७
– अॅनोफिलीस डासांची उत्पत्तीस्थाने : ६,३९०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.