रूफटॉप सोलरमध्ये टाटा पॉवर अव्वल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर सोलरूफने आर्थिक वर्ष २०२६-२०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत विक्रमी कामगिरी केली आहे. जुलै-सप्टेंबर या तीन महिन्यांत कंपनीने तब्बल ८८ हजार ३९७ रूफटॉप सोलर संच बसवले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ६६ हजार ४४७ संच बसवले होते. त्या तुलनेत ३३ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. स्थापित क्षमता ३६९ मेगावॅटवरून १५ टक्के वाढीसह ४२६ मेगावॅट-पीकवर पोहोचली आहे.
टाटा पॉवरने आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एक लाख ६८ हजार ५३० पेक्षा अधिक संच बसवले असून, गेल्या वर्षीच्या एक लाख १२ हजार ७२९ च्या तुलनेत ही ५० टक्क्यांनी वाढ आहे. तर एकूण क्षमता ८०१ मेगावॉट झाली आहे. या कामगिरीमुळे देशातील नंबर-१ रूफटॉप सोलर कंपनी म्हणून टाटा पॉवर सोलरूफचे स्थान मजबूत झाले आहे. दरम्यान, देशभरातील निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील एकूण इन्स्टॉलेशनचा आकडा आता पाच लाख ७५ हजारांवर पोहोचला असून, एकूण क्षमता ५.६७ गिगावॉटपेक्षा अधिक झाली आहे. टाटा पॉवरने मागील सहा महिन्यांत उत्तर प्रदेशात सर्वाधिक ४४ हजार १४ संच बसवले आहेत. महाराष्ट्र २२ हजार १६५, राजस्थानात २१ हजार २७५ आणि केरळमध्ये १५ हजार ४७७ संच बसवले आहेत.