कसारा मार्गांवर १२ दिवसांचा ब्लॉक
लोकल, मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गाच्या कामासाठी कसारा यार्डमध्ये मध्य रेल्वेकडून ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवसांचा विशेष वाहतूक व विद्युत ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकच्या पुढील टप्प्यात १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान आसनगाव-कसारा यादरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे काही लोकल आसनगाव येथेच थांबवून परतीच्या दिशेने सोडण्यात येतील. मुंबईकडे येणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या ३५ ते ४० मिनिटे, तर मुंबईहून जाणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावतील.
आसनगाव-कसारा तिसरा मार्ग हा कसारा-कल्याण तिसरा आणि चौथा मार्ग प्रकल्पाचा भाग आहे. या मार्गामुळे मेल-एक्स्प्रेस आणि उपनगरी वाहतूक स्वतंत्र करण्यास मदत होणार असून, भविष्यात अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करणे शक्य होणार आहे. कसारा यार्डमध्ये प्री-नॉन इंटरलॉकिंग, नॉन इंटरलॉकिंग आणि पोस्ट-नॉन इंटरलॉकिंगची कामे टप्प्याटप्प्याने केली जाणार आहेत. यामध्ये १० ऑक्टोबरला दुपारी ३.३५ ते रात्री ९.३५, ११ ऑक्टोबरला सकाळी ११.३० ते सायंकाळी ६.३०, तर १२ आणि १३ ऑक्टोबरला दुपारी ३.३५ ते रात्री ८.३५ या वेळेत ब्लॉक राहणार आहे.
लोकल आसनगावपर्यंतच
१०, १२ आणि १३ ऑक्टोबरला सीएसएमटीहून दुपारी १.१०, २.१७, २.४६ आणि ४.५० वाजता सुटणाऱ्या कसारा लोकल आसनगाव येथेच थांबतील. कसारा येथून दुपारी ३.३५, ४.१६, ५.०२ आणि ६.१७ वाजता सुटणाऱ्या लोकल त्याऐवजी आसनगाव येथून अनुक्रमे ४.१२, ४.५४, ५.३९ आणि ६.५४ वाजता सीएसएमटीसाठी रवाना होतील. ११ ऑक्टोबरला सीएसएमटीहून १.१०, २.१७ आणि २.४६ वाजता सुटणाऱ्या कसारा लोकल आसनगावपर्यंतच धावतील.
ब्लॉकनंतर पहिली लोकल
१० ते १३ ऑक्टोबरदरम्यान सीएसएमटीहून कसारासाठी दुपारी १२.३० वाजता, तर कसारा येथून सीएसएमटीसाठी दुपारी २.४२ वाजता ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सुटेल. ब्लॉकनंतर १०, १२ आणि १३ ऑक्टोबरला सीएसएमटीहून कसारासाठी सायंकाळी ६.२८ वाजता, तर ११ ऑक्टोबरला सायंकाळी ४.५० वाजता पहिली लोकल सुटेल. सीएसएमटीच्या दिशेने ब्लॉकनंतर १० ऑक्टोबरला रात्री ८.३५, ११ ऑक्टोबरला सायंकाळी ६.३०, तर १२ आणि १३ ऑक्टोबरला रात्री ८.१५ वाजता पहिली लोकल सुटेल.
मेल-एक्स्प्रेसना फटका
१०, १२ आणि १३ ऑक्टोबरला गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, हरिद्वार-एलटीटी एसी एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस आणि कामायनी एक्स्प्रेससह अनेक गाड्या इगतपुरी किंवा त्यापूर्वी नियंत्रित केल्या जातील. त्यामुळे या गाड्या गंतव्यस्थानी ३५ ते ४० मिनिटे उशिराने पोहोचतील. ११ ऑक्टोबरला धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस, पाटलीपुत्र-एलटीटी एक्स्प्रेस, नांदेड-सीएसएमटी वंदे भारत, प्रयागराज-एलटीटी दुरांतो आणि गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेससह अनेक गाड्यांना ३५ ते ४० मिनिटांचा विलंब होणार आहे.
वेग मंदावणार
१०, १२ आणि १३ ऑक्टोबरला एलटीटी-राजगीर एक्स्प्रेस, सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेससह अनेक गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावतील. ११ ऑक्टोबरला सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी, एलटीटी-बलिया कामायनी, दादर-गोरखपूर आणि सीएसएमटी-हावडा दुरांतोसह इतर गाड्यांनाही विलंब होणार आहे.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.